मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाबाबत सर्वत्र दाखवल्या जाणाऱ्या बेफिकीरीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चिंता व्यक्त केली असून, कोरोना नियंत्रणासाठी लागू असलेल्या नियमावलीची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देशही त्यांनी  प्रशासनाला दिले आहेत. काही जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांचं वाढतं प्रमाण लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी काल सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा पोलिस प्रमुख यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली. त्यात स्थितीचा आढावा घेतल्यानंतर ते बोलत होते. मास्क वापरा, गर्दी टाळा अन्यथा पुन्हा एकदा लॉकडाऊनला सामोरं जावं लागेल, असंही ते म्हणाले. जे नियमांचं पालन करणार नाहीत, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, आणि वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. आंदोलने, सभा, मिरवणुका यांना परवानगी देऊ नये. विवाह समारंभामध्ये उपस्थितांकडून नियमांचं पालन केलं जातंय का याची तपासणी करावी, ज्या भागात रुग्ण संख्या वाढतेय तिथं कंटनेमेंट झोन करायची तयारी ठेवावी, असे निर्देश त्यांनी दिले. राज्यात महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना सर्वसामान्यांना लागू असून त्याला दोन महिन्यांची मुदतवाढ दिली जाईल, असं मुख्यमंत्री म्हणाले.  कोरोना नियंत्रणासाठी जिल्ह्यांना दिलेल्या निधीपैकी शिल्लक असलेला निधी ३१ मार्चपर्यंत वापरायला परवानगी दिली आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितलं. ज्या भागात जास्त रुग्ण आढळून येत आहेत तेथील सार्वजनिक कार्यक्रमांमधील गर्दी नियंत्रणात राहण्यासाठी प्रशासनाने लक्ष देण्याची सूचना आरोग्यमंत्री. टोपे यांनी केली.

दरम्यान मुंबईत कोरोना रुग्णसंख्या वाढते आहे, ती अशीच वाढत राहिली तर नाईलाजास्तव लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल असे संकेत राज्य सरकारने दिले आहेत. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन नको असेल तर नागरिकांनी खबरदारी घ्यायला हवी, असं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. लोकांनी काळजी घेतली नाही, आणि रुग्णसंख्या वाढत राहिली तर मात्र राज्य सरकार आणि महापालिकेला लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल, असं त्यांनी सांगितलं.