मी 22 ते 26 ऑगस्ट 2019 दरम्यान फ्रान्स, युएई आणि बहरीनचा दौरा करणार आहे.

नवी दिल्ली : माझा फ्रान्स दौरा मजबूत धोरणात्मक भागीदारीचे प्रतिबिंब आहे ज्याला दोन्ही देश खुप महत्व देतात. 22 आणि 23 ऑगस्ट रोजी फ्रान्समधे माझ्या द्विपक्षीय बैठका आहेत, यामधे अध्यक्ष मॅक्रॉन यांच्याबरोबर शिखर परिषद स्तरावरील चर्चा आणि पंतप्रधान फिलीप यांच्याबरोबर बैठकीचा समावेश आहे. मी भारतीय समुदायाशीही संवाद साधणार असून, 1950 आणि 1960 मध्ये फ्रान्स इथे एअर इंडियाच्या दोन विमान अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या भारतीयांच्या स्मृतिप्रित्यर्थ एक स्मारक समर्पित करणार आहे.

25 आणि 26 ऑगस्ट रोजी मी जी-7 शिखर परिषदेच्या बैठकीत सहभागी होणार आहे. अध्यक्ष मॅक्रॉन यांच्या निमंत्रणावरुन पर्यावरण, हवामान, महासागर आणि डिजिटल परिवर्तनावरील सत्रांमधे बियारिट्ज भागीदार म्हणून सहभागी होणार आहे.

भारत आणि फ्रान्स दरम्यान उत्तम द्विपक्षीय संबंध असून, उभय देशांसाठी तसेच जगासाठी शांतता आणि समृद्धी वृद्धिंगत करण्याची आमची सामायिक दूरदृष्टी यामागे आहे. आमची मजबूत, धोरणात्मक आणि आर्थिक भागीदारी, दहशतवाद, हवामान बदल यासारख्या जागतिक समस्यांवरील सामायिक दृष्टीकोनानी प्रेरीत आहे. मला विश्वास आहे की, या दौऱ्यामुळे परस्पर समृद्धी, शांतता आणि प्रगतीसाठी फ्रान्स बरोबरच्या आपल्या दीर्घकालीन आणि महत्वपूर्ण मैत्रीला अधिक प्रोत्साहन मिळेल.

23 आणि 24 ऑगस्ट रोजी मी संयुक्त अरब अमिरातीचा दौरा करणार आहे. अबुधाबीचे राजपुत्र शेख मोहम्मद बिन झाएद अल नाहयान यांच्याबरोबर चर्चेसाठी मी उत्सुक आहे. यावेळी द्विपक्षीय संबंध तसेच प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय दृष्ट्या परस्पर हिताच्या मुद्यांवर चर्चा होईल.

महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीच्या स्मृतिप्रित्यर्थ मी अबुधाबीच्या राजपुत्रासह संयुक्तपणे एका टपाल तिकीटाचे प्रकाशन करण्यासही उत्सुक आहे. या दौऱ्यात युएई सरकारचा ‘ऑर्डर ऑफ झाएद’ हा सर्वोच्च नागरीक सन्मान स्वीकारणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब असेल. परदेशात रोकड विरहित व्यवहारांचे जाळे विस्तारण्यासाठी मी रुपेकार्ड देखील अधिकृतरित्या जारी करणार आहे.

भारत आणि युएई दरम्यान निरंतर उच्चस्तरीय संवादांमुळे आपले संबंध अधिक मजबूत झाले आहेत. युएई हा आपला तिसरा सर्वात मोठा व्यापार भागीदार आणि भारतासाठी चौथा सर्वात मोठा खनिज तेलाचा निर्यातदार आहे. या संबंधांमधे झालेली दर्जात्मक वाढ ही आपल्या परकीय धोरणाच्या यशाचा एक भाग आहे. या दौऱ्यामुळे युएईबरोबरचे आपले बहुआयामी द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत होतील.

24 आणि 25 ऑगस्ट रोजी मी बहरीनचा दौरा करणार आहे. भारतीय पंतप्रधानांचा हा पहिलाच बहरीन दौरा असणार आहे. बहरीनचे पंतप्रधान राजपुत्र शेख खलिफा बिन सलमान अल खलिफा यांच्याबरोबर द्विपक्षीय संबंधांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्यांवर मत जाणून घेण्यासाठी, चर्चा करण्यासाठी मी उत्सुक आहे. बहरीनचे राजे शेख हमाद बिन ईसा अल खलिफा आणि अन्य नेत्यांनाही मी भेटणार आहे.

भारतीय समुदायाशी देखील संवाद साधण्याची संधी मी साधणार आहे. जन्माष्टमीच्या पवित्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आखातातील सर्वात जुन्या श्रीनाथजी मंदिराच्या पुनर्विकासाच्या औपचारिक शुभारंभाला उपस्थित राहण्याचे भाग्य मला लाभणार आहे. मला विश्वास आहे की या दौऱ्यामुळे सर्वच क्षेत्रात आपले संबंध अधिक दृढ होतील.