नवी दिल्ली : लिथुआनिया, लात्विया आणि इस्टोनिया या तीन बाल्टीक देशांचा दौरा आटोपून उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू आज सकाळी मायदेशी परतले. या तिन्ही देशांबरोबर भारताने द्विपक्षीय संबंध दृढ केले. या तिन्ही देशांनी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताला कायम स्वरुपी सदस्यत्व मिळावे, यासाठी सहकार्य करण्याबाबत सहमती दर्शवली आहे.

या दौऱ्यादरम्यान नायडू यांनी तिन्ही देशांच्या प्रमुखांबरोबर व्यापक चर्चा केली. तसेच व्यापार मंच आणि भारतीय समुदायाला संबोधित केले. या तिन्ही बाल्टीक देशांनी दहशतवादाविरोधात लढण्यासाठी भारताबरोबर एकत्रितपणे काम करण्याचे आश्वासन दिले.

नायडू यांनी दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात लिथुआनियाला भेट दिली. त्यांनी लिथुआनियाचे अध्यक्ष गितानस नौसेदा यांनी भेट घेऊन त्यांना काश्मीरमधून कलम 370 रद्द करण्याच्या भारत सरकारच्या निर्णयाबाबत माहिती दिली. पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा निषेध केल्याबद्दल त्यांनी लिथुआनिया सरकारचे आभार मानले. तिथल्या भारतीय समुदायाला संबोधित करताना ते म्हणाले की, नवीकरणीय ऊर्जा, कृषी उत्पादन प्रक्रिया आदी क्षेत्रात लिथुआनिया भारताचा महत्वपूर्ण तंत्रज्ञान भागिदार बनू शकतो.

लात्विया इथे भारतीय समुदायाला संबोधित करताना उपराष्ट्रपती म्हणाले की, अनिवासी भारतीयांच्या योगदानाचा भारताला अभिमान आहे. परदेशी गुंतवणूक, तंत्रज्ञान, अनुभव भारतात आणण्यात अनिवासी भारतीयांचा मोठा वाटा आहे, असं ते म्हणाले. आंतरराष्ट्रीय सौर आघाडीच्या माध्यमातून हवामान बदलाच्या समस्येचा सामना करण्यासाठी लात्वियाने सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.

दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात त्यांनी इस्टोनियाला भेट दिली. देशाच्या अंतर्गत बाबींमधे कोणाचाही हस्तक्षेप किंवा मध्यस्थी भारत स्वीकारणार नाही, असे नायडू यांनी स्पष्ट केले. जम्मू-काश्मीरची पुनर्रचना करण्याचा उद्देश तेथील प्रशासन सुधारणे आणि सर्वसमावेशक व समान विकासाला प्रोत्साहन देणे हा असल्याचे ते म्हणाले. इस्टोनियाच्या अध्यक्ष आणि पंतप्रधानांबरोबर त्यांनी व्यापक मुद्यांवर चर्चा केली.