नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक पातळीवर आर्थिक गैरव्यवहारांवर देखरेख ठेवणाऱ्या फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्स, म्हणजेच एफएटीएफ या संस्थेने पाकिस्तानचे नाव त्यांच्या करड्या यादीत कायम ठेवले आहे.
दहशतवादाला होणारा अर्थ पुरवठा रोखण्यात पाकिस्तानला अपयश आल्याने ‘एफएटीएफ’ने काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला.
याआधीच्या बैठकीत पाकिस्तानला दिलेल्या कृती आराखड्यावर या देशाने पूर्णपणे अंमलबजावणी केली नसून त्यांनी देशातले आर्थिक गैरव्यवहार आणि दहशतवाद्यांना मिळणाऱ्या आर्थिक रसदीवर नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे, असे ‘एफएटीएफ’चे अध्यक्ष मार्कस प्लेयर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
पाकिस्तानने सर्वच दहशतवाद्यांवर आर्थिक निर्बंध घालावेत आणि ठोस कारवाई करावी, अशी सूचनाही यावेळी करण्यात आली.
जून महिन्यात याबाबत पुन्हा एकदा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल, असे प्लेयर यांनी यावेळी सांगितले.