मुंबई (वृत्तसंस्था) : आज मराठी भाषा गौरव दिन. कवी कुसुमाग्रज म्हणजेच वि. वा शिरवाडकर यांचा जन्मदीन. कुसुमाग्रज यांचा जन्मदिन दरवरर्षी मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमीत्तानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कुसुमाग्रजांना अभिवादन करत, राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. ‘मी मराठी, माझी मराठी हा बाणा जपूया! असं आवाहन त्यांनी आपल्या संदेशातून केला आहे. यासाठी मराठीत विचार करुया, मराठीत व्यक्त होऊया, दैनंदिन व्यवहारात मराठीचा वापर वाढवू या, मराठीतील्या लेखन-वाचनाच्या नव्या प्रयोगांचा स्वीकार करू या असं आवाहन त्यांनी केलं आहे. आपली मातृभाषेचा गौरव जपण हे प्रत्येकाचं कर्तव्य असल्याचं मुख्यमंत्र्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही मराठी भाषा दिनानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. जागतिक स्तरावर संपर्क, संवाद आणि व्यवहाराची भाषा म्हणून मराठीला स्थान मिळालं पाहिजे, संगणकाच्या आज्ञावली मराठीत विकसित झाल्या पाहिजेत, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रांबरोबरच औद्योगिक, आर्थिक, न्यायालयीन क्षेत्रातही मराठी भाषेचा वापर जाणीवपूर्वक वाढवला पाहिजे,असं पवार यांनी म्हटलं आहे.

विधानसभेतले विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही मराठी भाषा दिनानिमीत्त शुभेच्छा दिल्या आहेत. भाषा हे केवळ संवादाचं माध्यम नाही, तर तर त्यात संस्कारमूल्य सुद्धा असतं, आणि म्हणूनच मराठी अनमोल आहे, असं त्यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे.

मराठी भाषा गौरव दिनानिमीत्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आज १४ पुस्तकांचं प्रकाशन करणार आहे. यात मलिका अमर शेख संपादित नामदेव ढसाळ यांच्या समग्र वाङ्मरयाच्या दुसऱ्या खंडाचा, तसंच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे निवडक वाङ्ममय, नाटक आणि रंगभूमी परिभाषासंग्रह, तिकडून आणलेल्या गोष्टी आणि इतर पुस्तकांचा समावेश आहे.

आजच्या मराठी भाषा गौरव दिनानिमीत्त राज्यभरात कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करत विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. नाशिकमधे टिळकवाडी इथं कुसुमाग्रजांच्या निवासस्थानावर रोषणाई केरण्यात आली आहे. विविध संस्थांनी कुसुमाग्रजांच्या निवासस्थानाला भेट देवून त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी आपल्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गासोबत मराठी भाषेच्या वापराबाबत प्रतिज्ञा घेतली. जिल्ह्यात ठिकठिकाणी कविता वाचन, नाट्य संहिता वाचन आणि इतर उपक्रमांचं आयोजन केलं आहे.