नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : थोर संत गरु रविदास यांची आज जयंती. गरु रविदास यांच्या जयंती निमीत्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम. व्यंकैय्या नायडू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी त्यांना अभिवादन केलं.
गुरु रविदास हे थोर धर्मसुधारक होते, त्यांनी मानवतेच्या सेवेसाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं. त्यांनी समाजाला समानता, न्याय, शांती आणि सौहार्दाची शिकवण दिली, असं रामनाथ कोविंद यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.
संत रविदास यांचा वैश्विक बंधुत्वावर अढळ विश्वास होता, त्यांनी आपल्या लेखणी आणि शिकवणीतून एकतेच्या संदेशाचा प्रसार केला असं उपराष्ट्रपती एम. व्यंकैय्या नायडू यांनी म्हटलं आहे.
संत रविदास यांनी काही शतकांपूर्वीच समानता आणि परोपकाराची शिकवण अवघ्या जगाला दिली. त्यांची हीच शिकवण येणाऱ्या पीढ्यांना प्रेरणा देत राहील असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही संत रविदास यांना अभिवाद केलं आहे. संत रविदास यांनी आपल्या कार्यातून समाजात एकोपा निर्माण केला, तसंच समाजाच्या सर्वच स्तरातल्या लोकांच्या कल्याणासाठी काम केलं असं शाह यांनी म्हटलं आहे.