नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय खेळणी महोत्सव २०२१ हे आत्मनिर्भर भारताची निर्मिती आणि भारताच्या पुरातन परंपरा अधिक दृढ करण्याच्या दिशेनं टाकलेलं महत्वाचं पाऊल आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज पहिल्या इंडिया टॉय फेअर अर्थात भारतीय खेळणी महोत्सवाचं दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन केलं, त्यावेळी ते बोलत होते. हा महोत्सव केवळ व्यावसायिक किंवा आर्थिक उपक्रम नाही तर, भारताच्या पुरातन क्रिडा आणि खेळाच्या संस्कृतीचे बंध अधिक दृढ करायचा प्रयत्न असल्याचं ते म्हणाले.
भारतात तयार होणारी खेळणी ही परवणाऱ्या दरात उपलब्ध होतात, तसंच या खेळणी पर्यावरणपूरक उत्पादनांपासून बनवली जातात, त्यामुळे ती सुरक्षितही असतात असं त्यांनी सांगितलं. यापुढेही भारतातल्या खेळणी उत्पादकांनी पर्यावरणपुरक आणि मनस्वास्थ्याला अनुकूल असतील अशी खेळणी बनवावित असं आवाहन त्यांनी केलं. भारतीय खेळण्यांमुळे मनोरंजनही होतं, तसंच अगदी सोप्या पद्धतीनं वैज्ञानिक सिद्धान्तांतही समजून घेता येतात असं त्यांनी सांगितलं. लहान मुलांच्या शिकण्याच्या प्रक्रियेत खेळणी महत्वाची भूमिका बजावत असतात, त्यामुळे पालकांनी मुलांशी खेळायला हवं असं आवाहन त्यांनी केलं.
बुद्धीबळासह अनेक आंतरराष्ट्रीय खेळ आणि क्रीडा प्रकार भारताने जगाला दिले असल्याची माहिती त्यांनी दिली. भारताच्या खेळणी उद्योग जगताची अफाट क्षमता दडलेली आहे, आत्मनिर्भर भारत अभियानाच्या माध्यमातून या क्षमता अधिक पटीनं वाढवली जाईल आणि या उद्योगक्षेत्राची ओळख अधिक ठळक केली जाईल असं त्यांनी सांगितलं.