मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या कोविड केंद्रांमध्ये महिलांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत प्रमाण कार्यप्रणाली लागू करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत केली.

औरंगाबाद शहरातल्या रुग्णालयात डॉक्टरकडून महिलेचा विनयभंग झाल्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित झाला, त्यावर माहिती देताना पवार म्हणाले की, सरकारनं या घटनेची गांभीर्यानं दखल घेतली आहे.

याप्रकरणाची प्राथमिक चौकशी स्थानिक महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांमार्फत केली, त्यात विनयभंगाचा प्रयत्न झाल्याच्या आरोपात प्रथमदर्शनी तथ्य आढळल्यानं आरोपी डॉक्टरला बडतर्फ केलं आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी करुन अहवाल आल्यानंतर पुढची कारवाई केली जाईल, असं त्यांनी सांगितलं.

यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी सरकारवक टीकास्त्र सोडलं. महिलांवर रोज अत्याचार होत असून कोविड सेंटर साठी मार्गदर्शक तत्वं जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली.

पुरवणी मागण्यांवरच्याच्या चर्चेला भाजपच्या आशिष शेलार यांनी सुरुवात करीत राज्याचे मुख्यमंत्री मुंबईचे असताना इथल्या समस्यांसाठी दिलेला निधी बारामती परिसराला दिला गेलेला निधी यातील तफावत समोर आणली.