नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राम मंदिर समर्पण निधी गोळा करण्यावरुन आज विधानसभेत गदारोळ झाला. राज्यात आणि देशात श्रीराम जन्मभूमीसाठी निधी संकलन मोहीम कोणत्या आधारे सुरू आहे, कायद्यानं पैसे गोळा करता येतात का, अशी विचारणा काँगेसचे नाना पटोले यांनी सरकारला विचारणा केली. त्याला जोरदार हरकत घेत विरोधक आक्रमक झाले, आणि गदारोळ सुरु झाला. त्यामुळे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी कामकाज दहा मिनिट तहकूब केलं.

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक कधी घेणार असा प्रश्न सुधीर मुनगंटीवार यांनी आज उपस्थित केला. राष्ट्रपती राजवट लागली तर रडू नका, तसंच  घटनेची पायमल्ली करु नका, असं मुनगंटीवार म्हणाले.

जळगावमधल्या शासकीय आशादीप महिला वसतीगृहात मुलींना कपडे काढून नृत्य करायला भाग पाडल्याची घटना पूर्णपणे असत्य असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज विधानसभेत दिली. या प्रकरणी चौकशी करणाऱ्या महिला अधिकाऱ्यांच्या समितीचा अहवाल त्यांनी सभागृहात ठेवला. पूर्ण माहिती न घेता याबाबत वृत्त प्रसारीत केल्या गेल्याचं त्यांनी सांगितलं.