मुंबई : माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्या निधनाने एक श्रेष्ठ संसदपटू, आणिबाणीविरूद्ध कठोर संघर्ष करणारा नेता, मानवी हक्कांचा खंदा समर्थक, एक उत्तम व निष्णात विधिज्ञ आणि संघर्षशील नेतृत्व आपण गमावले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात, श्री. जेटली यांच्या निधनाने मी अतिशय व्यथित झालो आहे. अगदी तरुण वयात एक उमदा विद्यार्थी नेता म्हणून राजकारणात सक्रिय झालेल्या जेटलीजींनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून आपल्या नेतृत्वगुणांची चमक दाखवली होती. मोदी सरकारच्या पहिल्या पर्वात अर्थमंत्री म्हणून त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची राहिली. या कालावधीत अत्यंत क्रांतिकारी अशा निर्णयांनी त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला मजबुती दिली होती. जीएसटीच्या अंमलबजावणीत त्यांनी दिलेले योगदान कायम अधोरेखित होत राहील.
राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी सांभाळताना वरिष्ठांच्या या सभागृहातील विविध चर्चा वादविवादांना त्यांनी एक अनोखी उंची प्राप्त करून दिली होती. महिला आरक्षण, जनलोकपाल विधेयक अशा अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर त्यांचा आग्रही पुढाकार मूल्यांशी बांधिलकी दर्शवणारा होता. प्रकृती प्रतिकूल असतानाही २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पडद्याआड आपल्या क्षमतांचा पूर्ण विनियोग करतानाच जवळजवळ प्रत्येक दिवशी ब्लॉगच्या माध्यमातून लेखन करीत प्रचारात स्वत:ला झोकून दिलेले आम्ही त्यांना पाहिले आहे. तसेच प्रकृती साथ देत नसतानाही अलिकडच्या काळात भाजपाच्या प्रत्येक बैठकांमध्ये ते उपस्थित राहत. त्यांचा समर्पण भावच त्यातून दिसून येतो.
देशाचे अर्थमंत्री, संरक्षणमंत्री, माहिती आणि प्रसारणमंत्री, विधि व न्याय विभागाचे मंत्री, राज्यसभेत विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी देशाची केलेली सेवा कायम स्मरणात राहील. महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना त्यांनी नेहमी पाठिंबा दिला. अटलजी, पर्रिकरजी, सुषमाजी यांच्या पाठोपाठ जेटलीजींच्या निधनाने संसदीय राजकारणातील अतिशय अभ्यासू असे व्यक्तिमत्त्व आपण गमावले असून माझीही वैयक्तिक हानी झाली आहे.