पिंपरी – लोकसंख्येच्या मागणीनुसार शहरासाठी आवश्यक ५४० दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी साठवणूक क्षमताच नसल्याने महापालिकेला पाणीकपात कायम ठेवावी लागणार आहे. याला पाणीटंचाई म्हणता येणार नाही, असे स्पष्टीकरण महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले. शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण शंभर टक्के भरलेले असले, तरीही आठवड्यातून एक दिवस पाणीकपात असेल.
जलसंपदा विभागाकडून शहरासाठी ४३० एमएलडी पाणी कोटा मंजूर आहे. अधिकची रक्कम भरून महापालिका दररोज ४८० एमएलडीपर्यंत पाणी उचलते. शिवाय एमआयडीसी ३० एमएलडी पाणी घेते. अशा ५१० दशलक्ष लिटर पाण्याचे वितरण केले जाते. निगडी-प्राधिकरण सेक्टर २३ मधील जलशुद्धीकरण प्रकल्पाची क्षमता ५४० एमएलडी आहे.
त्यापेक्षा अधिक पाणी उचलणे शक्य नसल्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. भामा-आसखेड आणि आंद्रा धरणातून प्रस्तावित २६७ एमएलडी पाणी शुद्धीकरणासाठी चिखली येथे प्रकल्प उभारण्यात येणार आहे. येत्या एक-दोन महिन्यांत त्याच्या उभारणीला सुरुवात होईल. आठवड्यातून एक दिवस पाणीकपात तूर्त कायम ठेवावी लागणार आहे. याला पाणीटंचाई असे म्हणता येणार नाही. पाणी वितरण व्यवस्थेचे ते नियोजन आहे.”