मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि शिवसेना यांचे प्रयत्न सुरु असून, त्यादृष्टीनं खलबतं सुरु आहेत. महाराष्ट्रात सरकार स्थापनेसाठी शिवसेनेबरोबर हातमिळवणी करता येईल का याविषयी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस येत्या ३-४ दिवसात दिल्लीमधे चर्चा करणार आहेत.

उभय पक्षांदरम्यान चर्चा झाल्यानंतर शिवसेनेबरोबर चर्चा होऊ शकते असं पक्षसूत्रांनी सांगितलं. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसनं सरकारचा किमान समान कार्यक्रम ठरवण्यासाठी पाच जणांची समिती स्थापन केली आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधीमंडळ पक्षनेते, अजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि नवाब मलिक यांचा समावेश आहे.

सरकार स्थापन करण्यासाठी आपला पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर चर्चा करुन सूत्र ठरवेल, असं शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. त्यापूर्वी त्यांची मुंबईत काँग्रेसच्या नेत्यांबरोबर चर्चा झाली. चर्चा योग्य दिशेने होत असल्याचं सांगत त्यांनी तपशील द्यायचं टाळलं. काँग्रेस कडून बाळासाहेब थोरात, विश्वजीत कदम, माणिकराव ठाकरे आणि अशोक चव्हाण चर्चेत सहभागी झाले.

राज्य विधानसभेच्या निवडणुकीनंतर कोणत्याही पक्षाला सरकार स्थापन करता आलं नाही म्हणून कालपासून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. २८८ आमदारांच्या विधानसभेत भाजपाचे १०५, शिवसेनेचे ५६, राष्ट्रवादीचे ५४ तर काँग्रेसचे ४४ आमदार आहेत.