मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात सत्तास्थापनेसाठी पुरेशा पाठबळाचं पत्र सादर करण्यात शिवसेना अपयशी ठरल्यानं, आणि त्यासाठी मुदतवाढ द्यायला नकार दिल्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सरकार स्थापन करण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसला विचारणा केली आहे.

राज्यपालांचं बोलावणं आल्यानंतर काल रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तसंच अजित पवार, छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि दिलीप वळसे पाटील यांनी राज्यपालांची भेट घेऊन चर्चा केली. या पक्षाला आज रात्री साडे आठ वाजेपर्यंतची मुदत दिली आहे. या संदर्भात काँग्रेसशी चर्चा करून निर्णय राज्यपालांना कळवला जाईल, असं जयंत पाटील यांनी बातमीदारांशी बोलतांना सांगितलं.

दुसरीकडे, काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या नेतृत्वाखालच्या, भारतीय जनता पक्षाच्या गाभा समितीची बैठक झाली. बैठकीनंतर बातमीदारांशी बोलतांना जेष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी, बदलत्या राजकीय परिस्थितीवर आम्ही बारकाईनं लक्ष ठेऊन असून सध्याच्या आमची भूमिका पहा आणि प्रतिक्षा करा, अशी असल्याचं सांगितलं.

दरम्यान, काँग्रेसचे वरिष्ठ नेते अहमद पटेल, के. सी. वेणुगोपाल, आणि मल्लिकार्जुन खरगे मुंबईत येत असून, ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सत्ता स्थापन करण्यासाठी राज्यपालांनी केलेल्या विचारणेबरोबरच, शिवसेनेला पाठिंबा देण्याबाबत आणि त्या अनुषंगानं सत्तेचं वाटप या विषयांवर या नेत्यांमध्ये चर्चा होईल, असं सूत्रांनी सांगितलं.