मुंबई (वृत्तसंस्था) : अभिनेत्री कंगना रानौत हिच्या बंगल्याच्या आवारातलं अनधिकृत बांधकाम तोडायला मुंबई उच्च न्यायालयानं उद्यापर्यंत स्थगिती दिली आहे. कंगनाच्या मुंबईतल्या बंगल्याच्या आवारातलं बांधकाम तोडण्याच्या मुंबई महानगरपालिकेनं काल दिलेल्या नोटिशीनुसार आज कारवाई सुरु झाली. ती थांबवण्यासाठी कंगनानं आज मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या प्रकरणी मुंबई महानगरपालिकेनं उद्यापर्यंत स्पष्टीकरण द्यावं, असे निर्देश न्यायालयानं आज दिले.

दरम्यान, कंगनाच्या बंगल्यावर कारवाईसंदर्भात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना आजही धमकीचे दूरध्वनी आल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. यापैकी एक दूरध्वनी हिमाचल प्रदेशातून आल्याचं, तर अन्य दोन दूरध्वनी इतर ठिकाणाहून आल्याचं या बातमीत सांगितलं आहे.