पिंपरी: पिंपरी चिंचवड शहरातील फ क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत कचरा संकलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मोरेवस्ती येथील कचरा संकलन रॅम्प येथे काम बंद आंदोलन केले.

कोरोणा संकट काळातही जीवाची पर्वा न करता शहरातील घाण संकलित केल्यानंतरही कंपनीने किमान वेतन दरानुसार, तसेच वेळेवर पगार देत नसल्याचा आरोप करत या कामगारांनी “काम बंद” आंदोलन करून शनिवारी करत निषेध केला.

कामगार सुनिता डाके म्हणाल्या की, गेल्या काही महिन्यांपासून कंपनी ने काही जाचक अटी लादल्याने कर्मचाऱ्यांची घुसमट होत आहे.

कामगार भारत तरकसे म्हणाले की, कोरोना काळात आम्ही प्रशासनाला सहकार्य करीत काम केलेले आहे, तरी देखील आम्हाला वेळेवर पगार दिला का जात नाही?

वाहन चालक शांती गवळी म्हणाल्या की, कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न अद्यापही सुटलेला नसून प्रत्येक महिन्याला केलेल्या कामाचा मोबदलाच कर्मचाऱ्यांना मिळत नसल्याची कर्मचाऱ्यांची तक्रार आहे. त्यामुळे रखडलेला पगार मिळावा, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.

वाहन चालक गणेश नागवडे म्हणाले की, कामगार कल्याण विभागाच्या निर्देशानुसार कामगारांना किमान वेतन दाराने पगार देणे बंधनकारक असतानाही पगार किमान वेतन दाराने का दिला जात नाही?

वाहन चालक अतुल क्षिरसागर म्हणाले की, दर महिन्याला वेतन संदर्भात काही ना काही अडचणी उद्भवत असतात, महापालिका प्रशासनाला कचरावेचक कामगारांचा प्रश्न महत्त्वाचा वाटत नाही का? अशा गोष्टींमुळे कामगारांमध्ये असंतोष निर्माण होत आहे. याची पालिकेने तात्काळ दखल घ्यायला हवी.

वाहन चालक प्रदिप धाटे म्हणाले की, कचरावेचक वाहनचालक व कर्मचारी महापालिका प्रशासनाला वेळोवेळी सहकार्य करीत आलेले आहेत. तरी देखील महापालिका प्रशासनाकडून कामगारांनी केलेल्या अतोनात कष्टाचा योग्य मोबदला दिला जात नाही हे अत्यंत संतापजनक आहे.

वाहन चालक बबलू देवकर म्हणाले की, कामगारांनी रोज काम करून देखील, त्यांना किमान वेतन दाराने वेतन का दिले जात नाही? यामुळे घरभाडे देता येत नसल्याने घरमालक कामगारांना घर सोडण्याचा तगादा लावतो. कामावर येण्यासाठी मोटारसायकलमध्ये पेट्रोल भरायला पैसे नाहीत. उधारी थकल्याने या सर्वांवर उपासमारीची वेळ आली. नाइलाजाने कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केले.”