नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पॅरिस करारांतर्गत पर्यावरण संतुलनासाठी निश्चित केलेलं लक्ष्य भारत लवकरच साध्य करेल, अशी ग्वाही पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज लोकसभेत दिली. या संदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितलं, भारतानं पर्यावरण रक्षणासाठी तयार केलेल्या सर्वंकष उपाय योजनांमुळे भारतात उत्सर्जनाचं प्रमाण 2005 ते 2016 दरम्यान 24 टक्क्यांनी घटलं आहे.
देशातल्या जंगल क्षेत्रातही 24 पूर्णांक 56 शतांश टक्के इतकी लक्षणीय वाढ झाल्याचं ते म्हणाले. स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत पुढील पाच वर्षात देशातल्या 100 शहरांमधलं प्रदुषण कमी करण्यासाठी केंद्र सरकार कटीबद्ध असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. अन्य विकसित देशाच्या तुलनेत देशातलं कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण कमी असल्याचं त्यांनी सांगितलं.