मुंबई (वृत्तसंस्था) : अकोला जिल्ह्यात अकोला शहरासह, मूर्तिजापूर, पातुर, बार्शीटाकळी आणि बाळापुर तालुक्यात गेले सलग दोन दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं हजेरी लावली. काही भागात गारपीटही झाली. यामुळे कांदा तसंच भाजीपाल्यासह, उन्हाळी पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. कृषी विभागानं पिकांच्या नुकानीच्या पाहणीचं काम सुरु केलं आहे.

जालन्यातही शहरासह, बदनापूर आणि घनसावंगी तालुक्यातल्या बहुतांश भागात काल संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. काही भागात गाराही पडल्या. या पावसामुळे गहू, कांदाबीज या पिकांसह द्राक्ष बागांचं नुकसान झाल्याचं वृत्त आहे.

परभणीत पुर्णा शहर आणि परिसरात काल संध्याकाळी वादळीवारा आणि विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. सुमारे अर्धातास पाऊस पडत होता.

जळगाव शहरासह जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी काल संध्याकाळनंतर वादळी वाऱ्यासह रिमझिम पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली. पाचोरा शहरात झाड पडल्यानं एका खाजगी वाहनाचं नुकसान झालं. मात्र सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही.

काही ठिकाणी वीजेचे खांब पडल्याचं, तर वीजेच्या तारा आणि पत्रे उडून गेल्याचंही वृत्त आहे.

बुलडाण्यातही काल संध्याकाळी गारपीटासह अवकाळी पाऊस पडला. खामगाव तालुक्यातल्या कंजारा या गावासह, शेगाव, चिखली, संग्रामपूर या भागात मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्यानं फळबागा आणी भाजीपाल्याचं नुकसान झालं आहे.

अहमदनगर जिल्ह्यात पाथर्डी तालुक्यात काल संध्याकाळी जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला, तर काही ठिकाणी गारपीट झाली. यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.