नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ब्रिस्बेन इथं झालेल्या चौथ्या आणि अंतिम कसोटी क्रिकेट सामन्यात विजय मिळवून भारतानं ही मालिकाही जिंकली आहे.
ऑस्ट्रेलियाचा या मैदानावर झालेला गेल्या ३२ वर्षातला हा पहिलाच पराभव आहे.विजयासाठी दुसऱ्या डावात ३२८ धावा करण्याचं लक्ष्य भारतापुढे होते.ते भारतीय फलंदाजांनी ३ गड्यांच्या मोबदल्यात पार केलं.
भारताच्या दुसऱ्या डावात शुभमन गिलनं ९१ धावांची उपयुक्त खेळी केली.मात्र विजयाचा खरा शिल्पकार रिषभ पंत ठरला.त्यानं नाबाद ८९ धावांची अविस्मरणीय खेळी केली.चेतेश्वर पुजारानं ५६ धावांचं योगदान दिलं.या विजयाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे.या संपूर्ण सामन्यात भारतीय संघानं आपल्यातला उत्साह आणि क्षमतांचं दर्शन घडवलं असं मोदी यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही मालिका विजयाबद्दल भारतीय संघाचं अभिनंदन केलं आहे.हा विजय संस्मरणीय असल्याचं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे.माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनीही भारतीय संघाचं अभिनंदन केलं आहे.
भारताच्या खेळाडूंनी खिलाडूवृत्तीचं दर्शन घडवलं,असं जावडेकर यांनी म्हटलं आहे.भारताच्या या विजयाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतीय क्रिकेट संघाचं आणि कर्णधार अजिंक्य रहाणे याचं अभिनंदन केलं आहे.
पहिल्या कसोटी सामन्यात पराभव झाल्यानंतरही भारतीय संघानं दुर्दम्य आशावाद आणि जिद्दीच्या जोरावर कसोटी मालिका जिंकली,ही अभिमानाची बाब आहे,असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.