मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात २६ जानेवारीपासून मॉल आणि काही व्यापारी आस्थापनं रात्रभर सुरु राहणार आहेत. आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत या निर्णयाला मंजूरी देण्यात आली. या निर्णयामुळे पोलिसांवर ताण येणार नाही, असं पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. या निर्णयामुळे राज्याचा महसूल वाढेल असं ठाकरे पुढे म्हणाले.

रात्रभर आस्थापनं चालू ठेवणं हे बंधनकारक नसेल. तसंच पब आणि बारसाठीची कालमर्यादा कायमच राहिल असंही ठाकरे म्हणाले. यामुळे सेवा क्षेत्रातली मनुष्य बळाची गरज वाढून रोजगार निर्मितीला हातभार लागेल असं ते म्हणाले.

एकीकडे मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती ढासळली असून मुंबईत बलात्कार, दरोडे, खून सारख्या घटना घडत असताना सामान्य जनेतेचं जीवन असुरक्षित असताना नाईटलाईफचा घाट कोणाचे बाल हट्ट पुरवण्यासाठी घेतला जात आहे. असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केला आहे.