मुंबई : बहुजनांच्या कल्याणासाठी स्थापन करण्यात आलेल्या इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग विभागासाठी असलेल्या विविध योजना सक्षमपणे राबविण्यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात स्वतंत्र निधीची मागणी करावी, असे निर्देश विभागाचे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिले.
विधानभवन येथे आयोजित विभागाच्या आढावा बैठकीत श्री.कडू बोलत होते. यावेळी संबंधीत विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या संदर्भात मार्गदर्शन करताना राज्यमंत्री श्री.कडू म्हणाले, राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांच्या अर्जाचे नमुने तातडीने लाभार्थ्यांसाठी उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. त्याकरिता सर्व अर्जांचे नमुने तातडीने तयार करुन राज्यात वितरित करण्यात यावेत.
वसतिगृहासाठी जागा, विद्यार्थ्यांसाठी असलेले अनुदान, विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्तीचा निधी याची योग्य ती मागणी करावी. लाभार्थ्यांकडून आलेल्या सर्व प्रस्तावावर तातडीने कार्यवाही करावी. अपंग, अनाथ, विधवांचे पाल्य यांच्याकरिता अनुदानात अधिकचा निधी कसा वाढविता येईल याचाही विचार करावा. शासकीय वसतिगृहांच्या उभारणीसाठी आवश्यक असलेल्या जागांच्या संदर्भात सध्याच्या काळाची गरज पाहता अभ्यास करावा व त्यानुसार योग्य प्रस्ताव सादर करावा, असेही श्री.कडू यांनी सांगितले.