अनुषंगिक साहित्याची तात्काळ खरेदी करण्याचे निर्देश
सांगली : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सज्ज असून प्रशासनाचे परिस्थितीवर पूर्ण नियंत्रण आहे. या संकटाचा मुकाबला करत असताना आवश्यक तो सर्व निधी उपलब्ध करून देणार असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, औषधे, वैद्यकीय उपकरणे, अनुषांगिक साहित्य यांची तात्काळ खरेदी करा. कोणतीही तडजोड करू नका, अशा सूचना जलसंपदा मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिल्या.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सद्यस्थितीत 1266 प्रवासी परदेशवारी करून आले आहेत. आयसोलेशन कक्षात ठेवण्यात आलेल्या 80 प्रवाशांपैकी 54 जणांची कोरोना विषाणू चाचणी निगेटिव्ह आली असून असून 25 जणांना कोरानाची लागण झाली आहे. या सर्वांवर मिरज सिव्हील हॉस्पीटल येथे उपचार सुरू आहेत व सर्वांची प्रकृती स्थीर आहे. एक जणाचा चाचणी अहवाल अप्राप्त आहे. ज्यांची चाचणी निगेटिव्ह आली आहे त्यांना घरी सोडण्यात आले आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत 40 व्यक्ती इन्स्टीट्युशनल क्वॉरंटाईनमध्ये आहेत. यामधील 27 व्यक्ती इस्लामपूर येथे तर 13 व्यक्ती मिरज सिव्हील हॉस्पीटल येथे आहेत. 212 व्यक्तींचा 14 दिवसांचा क्वॉरंटाईन कालावधी पूर्ण झाला आहे तर 934 परदेशवारी करून आलेली प्रवासी अद्यापही होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत.
या सर्व पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयंत पाटील यांनी विटा तहसिल कार्यालय येथे खानापूर, आटपाडी, कडेगाव या तालुक्यांची विटा तहसिल कार्यालय येथे बैठक घेतली. या बैठकीला आमदार अनिल बाबर, नगराध्यक्ष प्रतिभा पाटील, उपविभागीय अधिकारी शंकर बर्गे यांच्यासह सर्व तहसिलदार, गटविकास अधिकारी व संबंधित यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते. तर कवठेमहांकाळ, तासगाव, पलूस या तालुक्यांची तासगाव येथे आढावा बैठक घेतली. यावेळी आमदार सुमनताई पाटील, उपविभागीय अधिकारी डॉ. समीर शिंगटे यांच्यासह संबंधित तहसिलदार व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
विटा येथे श्रेयस नागरी सहकारी पतसंस्था विटा यांच्यावतीने बाबासाहेब मुळीक यांनी 1 लाख रूपयांचा धनादेश तर तासगाव येथे आमदार सुमनताई पाटील यांनी एक महिन्याच्या वेतनाचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे सुपूर्द केला.
यानंतर पालकमंत्री जयंत पाटील यांनी इस्लामपूर येथील कोरोना बाधित रूग्णांवर मिरज सिव्हील हॉस्पीटल येथे करण्यात येत असणाऱ्या उपचारांबाबत मिरज सिव्हील हॉस्पीटल येथे भेट देऊन आढावा घेतला. यावेळी जे. जे. रूग्णालय मुंबई च्या अधिष्ठाता डॉ.पल्लवी सापळे, मिरज शासकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत त्यांनी रूग्णांच्या प्रकृतीची चौकशी करून त्यांना देत असणाऱ्या वैद्यकीय सुविधांचाही आढावा घेतला. सद्यस्थितीत मिरज सिव्हील हॉस्पीटलमध्ये 315 बेड उपलब्ध असून यामध्ये 15 आयसीयु बेडचा समावेश आहे. या ठिकाणी उपलब्ध व्हेंटीलेटर्स, पीपीई किटस् यांचा आढावा घेऊन हाफकीन संस्थेमध्ये थेट दूरध्वनीव्दारे जिल्ह्याला अधिक व्हेंटीलेटर्स व पीपीई किटस्ची आवश्यकता असून यासाठी आवश्यक प्रक्रिया तात्काळ राबवा व सामग्री उपलब्ध करून द्या, अशी मागणी केली. यावेळी त्यांनी खाजगी हॉस्पीटलमधील व्हेंटीलेटर्सही भाड्याने घेण्यात यावेत अशा सूचना दिल्या. याबरोबरच त्यांनी खाजगी वितरकांकडूनही व्हेंटीलेटर्स व पीपीई किटस् उपलब्ध करून घ्यावेत यासाठी आवश्यक निर्देश दिले.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा पालकमंत्री जयंत पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत घेतला. या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, महापौर गीता सुतार, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम तसेच आरोग्य यंत्रणांचे प्रमुख, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अनेक खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांनी आपले दवाखाने बंद ठेवल्याच्या तक्रारी अनेक ठिकाणी होत आहेत. यावर बोलताना पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, वैद्यकीय व्यवसायिकांनी संकटाच्या वेळी दवाखाने बंद ठेवणे ही बाब अत्यंत गैर असून समाजातून शिकलेले डॉक्टर्स आहेत त्यांनी समाजाला अशा गरजेच्या वेळी सेवा दिलीच पाहिजे. या संबंधात जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिलेल्या आदेशांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी, असे निर्देश पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले.
परदेशवारी करून आलेल्या प्रत्येक प्रवाशावर बारकाईने लक्ष ठेवा, ज्यांना होम क्वॉरंटाईनच्या सूचना देण्यात आल्या आहेत त्यातील एकही व्यक्ती रस्त्यावर बाहेर पडू नये यासाठी काटेकोर अंमलबजावणी करा. होम क्वॉरंटाईन मधील जर एखादी व्यक्ती बाहेर फिरत असल्यास कोणाचाही मुलाहिजा न बाळगता गुन्हे दाखल करा, असे निर्देश पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले.
द्राक्ष, डाळिंब, नाशवंत कृषी माल यांच्यासाठीचे वाहतूक परवाने प्रशासनामार्फत देण्यात येत आहेत. ते अधिक सुरळित पध्दतीने देण्यात यावेत. यामध्ये कोणताही अडथळा निर्माण होऊ नये असे, पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.
तालुकास्तरीय गावे, मोठी गावे, एमआयडीसी, ज्या गावांमध्ये कामगार, मजूर वर्ग मोठ्या प्रमाणात आहेत त्या ठिकाणी अशा कामगारांच्या जेवणाचा प्रश्न सुटावा यासाठी आवश्यक तेथे त्वरीत शिवभोजन केंद्रे सुरू करावीत, असे निर्देश पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिले.
स्वस्त धान्य पुरवठा सुरळीत व घरपोच व्हावा असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, जीवनावश्यक वस्तुंची साठेबाजी, जादा दराने विकणे या बाबी कोणीही करू नयेत. जर कोणी असे करताना व प्राप्त परिस्थितीचा गैर फायदा उठविताना निदर्शनास आल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
महानगरपालिका, नगरपालिका, मोठी गावे यांनी स्वच्छतेबाबत आवश्यक सर्व खबरदारी घ्यावी, असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, पोलीसांना गर्दीच्या नियंत्रणासाठी, नियमनासाठी ड्रोन कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्याच्या दृष्टीनेही प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे यामध्ये वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहिले पाहिजेत याबाबतही पालकमंत्री जयंत पाटील यांनी यंत्रणांना निर्देश दिले.
इस्लामपूर येथे एकाच कुटुंबातील सदस्य व निकटवर्तीय अशा 25 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शहरात प्रादुर्भावाची व्याप्ती वाढणार नाही यासाठी आवश्यक खबरदारी घेण्यात येत असल्याचे सांगून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन, जिल्हा प्रशासन युद्ध पातळीवर प्रयत्न करीत आहे. याला जिल्ह्यातील जनतेनेही परिस्थितीचे भान ठेवून सहकार्य केले पाहिजे. संकट अतिशय गंभीर आहे. छोट्या छोट्या कारणांनी घराबाहेर पडू नका. प्रशासनावर ताण येणार नाही अशा पद्धतीने आपले वर्तन ठेवा. कोरोनाच्या संक्रमणाची सायकल तोडण्यासाठी कृपा करून घरीच थांबा, असे आवाहनही पालकमंत्री जयंत पाटील यांनी यावेळी केले.