मुंबई (वृत्तसंस्था) : गहू, तांदळाच्या बाबतीत आपला देश स्वयंपूर्ण झाला आहे. बाजारपेठेनुसार शेती पिकं घेतली तर उत्पादनाला चांगला भाव मिळतो.यासाठी बाजारपेठेच्या मागणीनुसार विविध डाळी आणि फळपिकांचे उत्पादनही शेतकऱ्यांनी घ्यावं, असं आवाहन ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी केलं.

बारामती इथल्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये कालपासून २४ जानेवारी २०२१ पर्यंत ‘कृषिक’ या कृषि तंत्रज्ञान सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. उपलब्ध बाजारपेठेचा फायदा शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी कृषी विज्ञान केंद्रानं शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं, असंही ते म्हणाले.

शेतीसाठी पाणी हा महत्त्वाचा घटक आहे. शेतीसाठी किती प्रमाणात आणि कशा प्रकारे पाण्याचा वापर करावा, त्यादृष्टीनं या विज्ञान केंद्रानं मार्गदर्शन करावं, असं त्यांनी सांगितलं. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील,कृषिमंत्री दादाजी भुसे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि सॉलिडारिडार आशिया या संस्थांमध्ये झालेल्या सामंजस्य कराराच्या प्रतीचं हस्तांतरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आलं.