मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात आजपासून आठवड्यातले चार दिवस कोरोना प्रतिबंधक लसीकरण होणार असून, या लसीकरणाच्या तयारीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल आढावा घेतला.
मंगळवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवारी राज्यातल्या २८५ केंद्रांवर लसीकरण होणार आहे. ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबवून आरोग्य कर्मचाऱ्यांचं लसीकरण करुन घ्यावं,असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
त्यांनी राज्यातले सर्व विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधत लसीकरणाच्या तयारीचा आढावा घेतला.
शनिवारी राज्यात लसीकरण मोहीम यशस्वीरित्या राबवल्याबद्दल त्यांनी यंत्रणेचे कौतुक केले.लसीकरणाच्या नोंदणीसाठी असलेल्या कोविड ॲपबद्दल त्यांनी माहिती घेतली.ह्या ॲपची कार्यपद्धती अधिक गतिमान होण्याकरिता काही जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना केल्या.त्या केंद्र शासनाला पाठवल्या जातील,असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
लसीकरणामध्ये दोन डोस घेतल्यानंतर १४ दिवसांनी रोग प्रतिकारक क्षमता तयार होते.त्यामुळे लसीकरणानंतरही कोरोना प्रतिबंधक नियमांचे सर्वांनी पालन करणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.