मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध केलेल्या आरोपांची चौकशी सीबीआयमार्फत व्हावी अशी मागणी त्यांनी याचिकेद्वारे केली आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीरसिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपाप्रकरणात, तूर्तास देशमुख यांचा राजीनामा घेतला जाणार नसल्याचा निर्णय, आपल्या पक्षानं घेतला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.
परमबीर सिंग यांनी त्यांच्या पत्रात देशमुख ज्यावेळी वाझे यांना भेटल्याचं म्हटलं आहे, त्यावेळी देशमुख हे विदर्भाच्या दौऱ्यावर होते, आणि त्यांना कोरोनाची लागण झाल्यानं २७ फेब्रुवारीपर्यंत ते उपचाराखालीच होते अशी वस्तुस्थितीही मलिक यांनी मांडली.
सिंग यांनी पुरावे तयार करायचं कटकारस्थान करुन, महाविकास आघाडी सरकार आणि गृहमंत्र्यांना बदनाम करायचा प्रयत्न केला असल्याचा आरोपही मलिक यांनी केला आहे. या बाबींचीही चौकशी करून कारवाई केली जाईल असंही मलिक यांनी सांगितलं.