मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत भांडूपमध्ये रुग्णालयाला गुरुवारी मध्यरात्री लागलेल्या आगीत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयातल्या 73 रुग्णांना जवळच्या खाजगी आणि सरकारी कोविड रुग्णालयात हलवलं आहे. या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5,00,000 रुपयांची मदत राज्य सरकारनं जाहीर केली आहे. उपराष्ट्रपती,राज्यपाल यांनी मृतांच्या कुटुंबियांप्रती सहवेदना व्यक्त केली आहे.
या आगीच्या दुर्घटनेची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल दुर्घटनाग्रस्त रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. ज्या मॉल्स किंवा इतर वास्तुंमधे कोविड रुग्णांच्या उपचारासाठी रुग्णालयं सुरु आहेत त्या ठिकाणच्या अग्नीसुरक्षेची तपासणी तात्काळ करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
ही घटना दुर्दैवी असून, राज्यात असे अपघात होऊ नयेत म्हणून आपण प्रशासनाला आधीच सूचना केल्या होत्या, तरीदेखील ही दुर्घटना झाली. या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून, फायर ऑडिट, स्ट्रकचरल ऑडीट केलं जाईल, कुठेही हलगर्जीपणा दिसला तर जबाबदार व्यक्तीवर योग्य कारवाई केली जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे ही दुर्घटना झाल्याचं निदर्शनास आलं असून याबाबत तक्रार दाखल करणार असल्याचं मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी सांगितलं आहे.भांडूप इथं रुग्णालयात लागलेल्या आगीची मुंबई उच्च न्यायालयानं स्वत:हून दाखल घेत चौकशीचे आदेश द्यावेत, अशी मागणी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी काल केली.
त्यांनी काल संबंधित रुग्णालयाला भेट दिली. भंडारा आग दुर्घटनेनंतर सर्व रुग्णालयांचं फायर ऑडीट करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं, मग या रुग्णालयाचं फायर ऑडीट का केलं नव्हतं, असा सवाल फडणवीस यांनी यावेळी विचारला.