मुंबई : महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) मार्फत स्थापन झालेल्या महिला बचत गटांतील महिलांनी स्वकमाईची एक एक रुपयाची बचत जमा करून कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना सुमारे 14 लाख 21हजार 228 रुपयांची मदत केली आहे. या निधीचा धनादेश उद्योगमंत्री सुभाष देसाई, महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुपूर्द केला जाणार आहे.

कोल्हापूर तसेच सांगली जिल्ह्यात 11 ऑगस्टपासून उद्भवलेल्या पूरस्थितीमुळे तेथील जनजीवन विस्कळीत झालेले आहे. तेथील नागरिकांना विविध सामाजिक संघटना, राज्य शासन, स्वयंसेवी संस्थेद्वारे मदत दिली जात असून महिला बचत गटांनीही त्यासाठी पुढाकार घेतला आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या महिला बचत गटातील महिलांनी एका आठवड्यात 14 लाख 21 हजार रुपयांची रक्कम गोळा केली आहे. महिला बचत गटातील  महिलांसह महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनीही यासाठी मदत दिली आहे. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील महिला बचत गटातील महिलांकडून निधी गोळा केलेला नाही.

बचत गटातील महिलांचा उत्साह वाढवण्यासाठी सहयोगिनी, व्यवस्थापक,लेखापाल, समन्वयक यांच्यासह महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आपले योगदान देऊन पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा (राज्यमंत्री दर्जा) ज्योती ठाकरे यांनी आपले एक महिन्याचे मानधन दिले आहे.

माविमने ओएनजीसी सोबत समन्वयाने नऊ लाख रुपयांचे साहित्य पाठवले. यामध्ये चार हजार किलो तांदूळ, चार हजार किलो पीठ, दोन हजार किलो तूर दाळ यासह इतर जीवनावश्यक वस्तू पाठविल्या आहेत. या शिवाय मसाला,हळद आदी गोष्टी पुरवल्या आहेत. दोन ट्रकद्वारे हे साहित्य गरजूंना पुरवण्यात आले आहे.

बुधवारी, सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री व उद्योगमंत्र्यांकडे हा धनादेश सुपूर्द केला जाणार आहे. महामंडळाच्या अध्यक्ष श्रीमती ठाकरे यांनी आवाहन केल्यानंतर महिला बचत गटांनी सढळ हाताने मदत केली आहे.