मुंबई : ग्रामीण भागातील शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये कुपोषणसंदर्भातील आजार बळावू नये आणि आरोग्य सुदृढ राहावे यासाठी राज्य शासन आणि डेसिमल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘द ब्रेकफास्ट रिव्होल्यूशन’ हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येणार आहे. हा प्रकल्प अमरावती जिल्ह्यातील दहा शाळांमध्ये राबविण्यात येणार असल्याची माहिती कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिली.
मंत्रालयात आज या प्रकल्पासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मंत्री डॉ. बोंडे बोलत होते. या बैठकीस मुख्यमंत्र्यांचे आरोग्य विषयक सल्लागार डॉ.आनंद बंग, डेसिमल फाऊंडेशनच्या ट्रस्टी नीलम जेठवाणी आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते.
श्री. बोंडे म्हणाले, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये कुपोषणासंदर्भात आजार बळावू नये यासाठी आहारासंदर्भातील प्रकल्प राबविण्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र शासनाच्या वतीने डेसिमल फाऊंडेशनसोबत करार केला आहे. या सामाजिक संस्थेद्वारे विद्यार्थ्यांना उच्च प्रतीचे सोयाबीन, बाजरा,मुरमुरे आणि ज्यामधून कर्बोदके, प्रथिने, पोषण,फायबर तसेच ए आणि डी जीवनसत्वे प्राप्त होतील अशा विविध पदार्थांचे वितरण करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या आहाराची तपासणीही करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या आहारात खंड पडू नये यासाठी सक्तीने हा आहार शिक्षकांच्या उपस्थितीतच घ्यावयाचा आहे. सहा महिन्यानंतर विद्यार्थ्यांच्या आरोग्याची पुन्हा तपासणी करण्यात येणार असून, यापद्धतीने आरोग्य सुधारण्याच्या प्रक्रियेत सातत्य ठेवण्याचे कार्य महाराष्ट्र शासन आणि डेसिमल फाउंडेशन करणार आहे.
या प्रकल्पाच्या यशानंतर हा प्रकल्प सर्वत्र राबविण्यात येणार असल्याची माहितीही डॉ. बोंडे यांनी दिली.