मुंबई (वृत्तसंस्था) : पदोपदी रूपं बदलणारा कोरोनाचा विषाणू आणि त्याच गतीनं क्षणोक्षणी स्वरूप बदलणारी गुन्हेगारी ही महाराष्ट्र पोलीस दलासमोरची आजची मोठी आव्हाने आहेत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.  ते आज नाशिक इथल्या महाराष्ट्र पोलीस अकॅडमीतील प्रशिक्षणार्थी पोलीस उप निरीक्षकांच्या ११८ व्या सत्राच्या च्या दीक्षांत संचलन समारंभात दूरदृश्य प्रणालीद्वारे बोलत होते. कर्तव्यदक्ष आणि धैर्यवान पोलीसांची दीर्घ परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. आज पोलीस अकादमीतून बाहेर पडणाऱ्या प्रशिक्षणार्थींनी पोलीस दलात जायचं स्वप्न पाहिलं आणि ते साकार केलं ही जीवनातली फार मोठी उपलब्धी आहे, अशी स्वप्न पहाययला मोठी दुर्दम्य इच्छाशक्ती लागते, ती पोलीस दलात येणाऱ्या प्रत्येकाच्या ठायी असते. भविष्यात तुमची स्वप्न ही केवळ तुमची स्वप्न नाहीत तर ती संपूर्ण महाराष्ट्राची स्वप्न आहेत. म्हणून हे सर्व प्रशिक्षणार्थी पोलीस जनतेच्या विश्वासाला सार्थ ठरवतील असा आशावादही यावेळी मुख्यमंत्र्यांनी यांनी व्यक्त केला.

पोलिस उपनिरिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडत असताना, नियमानं, कायद्यांनं वागा. परंतु, कायदा पाळताना, तुमच्यातली माणुसकीची, बंधुत्वाची भावना हरवू नका. तुम्ही घातलेल्या खाकी वर्दीच्या आत, जोपर्यंत माणुसकी जिवंत आहे, तोपर्यंतच तुमच्या खांद्यावरच्या स्टारना किंमत आहे. हे कायम लक्षात ठेवा, अस उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी म्हणाले. महाराष्ट्र पोलीस दलाचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी प्रशिक्षणार्थीचं महाराष्ट्र पोलीस दलामध्ये स्वागत केल. यावेळी सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणुन मानाची रिव्हॉल्वर,उत्कृष्ट आंतरवर्ग प्रशिक्षणार्थी , सर्वोत्कृष्ट महिला प्रशिक्षणार्थी म्हणुन अहिल्यादेवी होळकर कप या तीनही पुरस्काराची मानकरी म्हणुन शुभांगी चंद्रकांत शिरगावे या महिला प्रशिक्षणार्थीला सन्मानित करण्यात आले. तसेच सलीम शेख या प्रशिक्षणार्थींला उत्कृष्ट बाह्यवर्ग प्रशिक्षणार्थी म्हणुन परितोषिक देण्यात आले.  अविनाश वाघमारे या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यला व्दितीय सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणुन सन्मानित करण्यात आले.