मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार करत असलेल्या उपाययोजनांबाबत विविध क्षेत्रांमधल्या संबंधितांना विश्वासात घेऊन त्यांचं सहकार्य मिळवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांच्या निर्मात्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला.
निर्मात्यांनी यावेळी विविध सूचना मांडल्या, तसंच शासन घेईल त्या निर्णयांना पाठिंबा असेल असे निर्विवाद आश्वासन एकजुटीनं दिलं.या बैठकीत महेश भट, सुषमा शिरोमणी, मेघराज राजेभोसले, मनोज जोशी, सुबोध भावे, डॉ अमोल कोल्हे, सिद्धार्थ रॉय कपूर, अमित बहेल, निखिल साने, दीपक राजाध्यक्ष, अजय भाळवणकर, टी पी अग्रवाल, सतीश राजवाडे, संग्राम शिर्के, अशोक दुबे, नितीन वैद्य, अशोक पंडित, अभिषेक रेगे, दीपक धर आदींची उपास्थिती होती.यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख,आणि वरीष्ठ सरकारी अधिकारी उपस्थित होते. काल मुख्यमंत्र्यांनी वृत्तपत्रांचे संपादक, मालक, वितरक यांच्याशी, तसंच मराठी नाट्य निर्माता, आणि मल्टिप्लेक्स, चित्रपटगृह चालक संघटनेच्या प्रतिनिधीनांशीही दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला.
कोरोनाबाबत योग्य काळजी घेण्याच्या दृष्टीनं जनजागृती करण्यासाठी प्रसार माध्यमांनी सहकार्य करावं, असं आवाहन त्यांनी वृत्तपत्रांचे संपादक, मालक, वितरक यांच्याशी बोलताना केलं. कोरोना संसर्ग रोखणं आणि जनतेच्या आरोग्याला प्राधान्य यावर लक्ष केंद्रित करणं आजच्या घडीला अत्यावश्यक असून या लढ्यात माध्यमांची भूमिका महत्वाची आहे.आपण सगळे एकजुटीनं लढत आहोत ही भावना सर्वसामान्य जनतेत निर्माण झाली पाहिजे. ही लढाई एकट्या सरकारची नाही तर तुम्हा आम्हा सर्वांची आहे. अशावेळी सर्वांनी सरकार करीत असलेल्या प्रयत्नांना साथ दिली पाहिजे, याचे राजकारण नको.
आपण विविध सूचना दिल्यात त्या अंमलात आणण्यासंदर्भात सरकार निश्चितपणे विचार करेल, असं मुख्यमंत्री म्हणाले.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठी नाट्य निर्माता, आणि मल्टिप्लेक्स, चित्रपटगृह चालक संघटनेच्या प्रतिनिधीनांनाही कोरोना संक्रमण रोखण्यासाठी सहकार्य करण्याचं, विषाणूबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन केले.या दोन्ही संघटनांच्या प्रतिनिधीनींही कोरोना रोखण्याच्या शासनाच्या सर्व प्रयत्नांना सर्वतोपरी सहकार्य करु, असा सकारात्मक प्रतिसाद दिला. व्यायाम शाळांचे मालक, संचालक यांच्याशीही मुख्यमंत्र्यांनी काल कोरोना परिस्थितीबाबत संवाद साधला.
जान है तो जहान है. या उक्तीनुसार, जीव राहीला, तर पुढं आपण व्यायाम करू शकणार आहोत. त्यामुळे यापुढं राज्याच्या हिताचा म्हणून जो निर्णय घ्यावा लागेल, त्यात व्यायामशाळा-जिम चालकांनी सर्व शक्तीनिशी सहकार्य करावं, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. त्यावर, कोरोनाविरोधातल्या या लढ्यात आम्ही सर्वजण शासनासोबत आहोत, असं जिमचालकांनी सांगितलं.