मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात काल संद्याकाळपासून संपूर्ण टाळेबंदी सुरू झाली आहे. सोमवारी सकाळपर्यंत ही टाळेबंदी लागू राहील. या काळात फक्त अत्यावश्यक सेवाच सुरू राहतील. विनाकारण बाहेर पडणार्यांविरूद्ध कारवाई करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सोमबारी संपूर्ण टाळेबंदी उठली तरी राज्यात रात्रीची संचारबंदी सुरूच राहणार आहे. दरम्यान कोरोना प्रतिबंधक उपायांवर निर्णयासाठी सर्वपक्षीय बैठक होत असून त्या बैठकीत काय निर्णय होतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

राजस्थानमधील काही शहरांमध्ये आजपासून 30 एप्रिल पर्यंत रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जयपूर, अजमेर, अल्वार, भिलवाडा, चित्तोडगढ, डुंगरपुर, जोधपुर, कोटा आणि अबूरोड मध्ये रात्री 8 ते सकाळी 6 संचारबंदी असणार आहे. बाजार संध्याकाळी 7 वाजता बंद होईल. तर उदयपूरमध्ये रात्रीची संचारबंदी संध्याकाळी 7 वाजता सुरु होणार असून दुकानं संध्याकाळी 6 वाजता बंद होतील. कोविड 19 च्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यस्तरीय कोविड नियंत्रण कक्ष पुन्हा सुरू करण्यात आले आहेत.

उत्तराखंडची राजधानी डेहराडून इथं रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळानं काल घेतला. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. तसंच, डेहराडून, हरिद्वार, नैनिताल आणि हल्दवानी या जिल्ह्यांमध्ये 30 एप्रिलपर्यंत 12 वी पर्यंतचे वर्ग बंद ठेवले जाणार आहेत.

दरम्यान उत्तर प्रदेशात विशेषतः राजधानी लखनौ मध्ये कोरोना रुग्णाची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री आणि लखनौचे खासदार राजनाथ सिंह यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केली. संरक्षणमंत्र्यांनी लखनऊ मधल्या या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. राज्य सरकार विविध रुग्णालयात खाटा उपलब्ध करून देत आहे, तसेच काही रुग्णालये ही केवळ कोविड ग्रस्तांच्या उपचारासाठीच ठेवण्यात आली आहेत असं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सिंग यांच्याशी बोलताना सांगितलं.