मुंबई : “क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांनी देशात स्त्रीशिक्षणाचा पाया रचला. स्त्रियांना शिक्षणाची दारं खुली करुन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणलं. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्पृश्यता, जातीभेद, धर्मांधतेसारख्या अनिष्ठ चाली-रितींविरुद्ध विचारांचा लढा पुकारला. बहुजनांच्या दु:खाचं, दारिद्र्याचं, मानसिक गुलामगिरीचं मूळ ‘अविद्ये’त असल्याचं सांगत त्यांना शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली. देशाला पुढे नेणारा, देशात राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्रांती घडवणारा सत्यशोधक विचार त्यांनी दिला. महात्मा जोतिराव फुले हे खऱ्या अर्थानं क्रांतीसूर्य होते. त्यांच्या प्रगत, पुरोगामी, सुधारणावादी, सत्यशोधक विचारांवर आजही महाराष्ट्राची वाटचाल सुरू आहे.” अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महात्मा जोतिराव फुले यांच्या कार्य व विचारांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करुन जयंतीनिमित्त त्यांना विनम्र आदरांजली वाहिली.