नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-१९ च्या रुग्णांची संख्या वेगानं वाढत असल्यामुळं कोरोनाविरुद्धचा लढा अधिक बळकट करण्यासाठी देशभरात आजपासून टिका उत्सव अर्थात लसीकरण उत्सव आयोजित करण्यात येत आहे. हा व्यापक जन लसीकरण कार्यक्रम १४ एप्रिलपर्यंत राबविण्यात येईल. अधिकाधिक पात्र लोकांचं लसीकरण व्हावं आणि लस वाया जाण्याचं प्रमाण कमीत कमी राहावं या मुख्य हेतूनं हे लसीकरण करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांना पुढाकार घेऊन ज्येष्ठ नागरिक आणि इतरांना कोविड लसीकरणासाठी नाव नोंदणीत मदत करण्याचं आवाहन केलं आहे.
कोविन पोर्टल आणि आरोग्य सेतु ऍपच्या मदतीने सर्व पात्र व्यक्ती नोंदणी करुन भेटीची वेळ निश्चित करु शकतात. लसीकरण केंद्रावर देखील प्रत्यक्ष नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे. देशात विविध राज्यांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वेगानं वाढताना दिसत आहे त्यामुळं लोकांनी लसीकरणासाठी पुढे यावं अशी विनंती करण्यात येत आहे.
आजपासून सुरु होणा-या टीका उत्सवात ‘ज्यांना स्वतःहून लस घ्यायला जाणं शक्य नाही त्यांना इतरांनी मदत करणं, उपचारासाठी मदत करणं, स्वतः मास्क वापरून आपला तसच इतरांचा जीव वाचवणं आणि सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र तयार करण्यासाठी पुढे येणं’ या चार तत्वांचं पालन करताना वैयक्तिक आणि सामाजिक स्वच्छता पाळण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. कोरोना महामारीविरुद्ध लढण्यासाठी टीका उत्सव महत्वाची भूमिका बजावणार असल्याचंही मोदी यांनी म्हटलं आहे. कोविड प्रतिबंधात्मक लसींचं वाया जाण्याचं प्रमाण शून्य करावं आणि पात्र नागरिकांनी लसी घेण्याचं आवाहन करत गरजेशिवाय लोकांनी घराबाहेर पडू नये असंही मोदी यांनी म्हटलं आहे. कुटुंबातील महिलांनी घरातील प्रत्येक पात्र लाभार्थीला लस देण्याची जबाबदारी घेतील असं सांगत या चार दिवसांत वैयक्तिक, सामाजिक आणि प्रशासकीय पातळीवर लोकांचं योगदान राहिल्यास कोरोनाविरुद्ध लढण्यास मदत होईल असाही विश्वास मोदी यांनी व्यक्त केला आहे.
तर महाराष्ट्रात आतापर्यंत १ कोटी ३८,४२१ जणांचं लसीकरण पूर्ण झालं असल्याची माहिती आरोग्य विभागाचे मुख्य सचिव डॉक्टर प्रदीप व्यास यांनी दिली आहे.
राज्यात युनिसेफकडून कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी मोहीम राबविली जात आहे.