मुंबई :- कोविड – १९ च्या पार्श्वभूमी व अडचणी निर्माण होऊन विद्यार्थ्यांना महाडीबीटी प्रणालीवर अर्ज सादर करण्यास विलंब होत आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती व फ्रिशिपच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता महाडीबीटी प्रणालीवर अर्ज सादर करण्यासाठी दि. ३० एप्रिल २०२१ पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आल्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

मंत्री श्री.वडेट्टीवार म्हणाले,  विजाभज, इमाव व विमाप्र  प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना महाडीबीटी प्रणाली मार्फत  राबविल्या जातात. सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षांमध्ये विजाभज, इमाव व विमाप्र  प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती व फ्रिशिपकरिता महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 मार्च देण्यात आली होती. मात्र, कोरोना संसर्गाच्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना महाडीबीटी प्रणालीवर अर्ज सादर करण्यास  विलंब होत आहे. हे निदर्शनास येताच विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थी शिष्यवृत्ती व फ्रिशिपच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यास आता दि. ३० एप्रिल २०२१ पर्यंत मुदत वाढ दिली आहे. तरी विद्यार्थ्यांनी या मुदतवाढीचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहनही श्री. वडेट्टीवार यांनी केले आहे.