The Prime Minister, Shri Narendra Modi addressing the Malayala Manorama News Conclave 2019 in Kochi via video conferencing, in New Delhi on August 30, 2019.

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्यावर्षी आपण सर्वांनी कोरोना एकत्र येवून हरवलं होतं आणि भारत ते पुन्हा एकदा तीच तत्वं पाळून, वेगानं आणि समन्वयानं करू शकतो असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसमवेत कोविड संदर्भातील उपाययोजनांच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते.

औषधे , ऑक्सिजन, व्हेंटीलेटर्स आणि लसीकरण आदी मुद्द्यांवर त्यांनीयावेळी चर्चा केली. चाचणी, रुग्णांचा शोध आणि उपचार याला कोणताही पर्याय नसल्याचं ठाम प्रतिपादन मोदी यांनी केलं आहे. स्थानिक प्रशासनानं नागरिकांबद्दल संवेदनशील राहणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले.

ही परिस्थिती हाताळण्यासाठी राज्यांबरोबर समन्वय राखणं आवश्यक असून कोविड रूग्णांसाठी रुग्णालयातील खाटा वाढवण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे आवश्यक असल्याचं मोदी यावेळी म्हणाले. तात्पुरती रुग्णालये आणि इतर केंद्रांमार्फत खाटाचा अतिरिक्त पुरवठा करावा असेही निर्देश पंतप्रधानांनी यावेळी दिले.

औषधांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी या उद्योगातील पूर्ण क्षमतेचा उपयोग करण्याची गरज व्यक्त करत रेमडेसीव्हीर आणि इतर औषधांच्या पुरवठ्याच्या स्थितीचा आढावा घेतला.

या इंजेक्शनच्या वाढीव उत्पादन क्षमतेची दखल घेत राज्यांना वेळेवर याचा पुरवठा करण्यासाठी समन्वय ठेवा असं सांगत रेमडेसीव्हीरसह इतर आवश्यक औषधांचा वापर वैद्यकीय मार्गदर्शक सूचनांनुसार करावा तसच त्याचा काळाबाजार रोखण्यासाठी कडक कारवाई करण्याच्या सूचना मोदी यांनी दिल्या आहेत.

त्याचबरोबर मान्यता मिळालेल्या ठिकाणी ऑक्सिजन प्लांट वेगानं उभारावेत असंही मोदी यांनी म्हटलं आहे. तर सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रातील लसीकरणाला पूर्ण क्षमतेने गती देण्याचे निर्देश मोदी यांनी या बैठकीत दिले.

या बैठकीला कॅबिनेट सचिव राजीव गौबा, पंतप्रधानांचेप्रधान सचिव डॉ. पी. के. मिश्रा, केंद्रीय गृह सचिव अजयकुमार भल्ला, केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण, नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही के पॉल आदी उपस्थित होते.