मुंबई (वृत्तसंस्था) : कोविड उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज सेनाप्रमुख जनरल MM नरवणे, संरक्षण सचिव आणि DRDO प्रमुखांशी चर्चा केली. या संकटकाळात नागरिकांना सोयी सुविधा आणि तज्ञांचं मार्गदर्शन उपलब्ध करुन द्यावं असं सिंग यांनी सांगितले. सेनेच्या प्रांतिक मुख्यालयांनी त्यांच्या इथल्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून सर्वतोपरी सहकार्य करावे असे ते म्हणाले.

देशातल्या ६७ कटकमंडळांनी त्यांच्या क्षेत्रातल्या रुग्णालयात आलेल्या कोणत्याही रुग्णाला उपचार द्यावे अशा सूचना बैठकीनंतर संरक्षण सचिवांनी जारी केल्या आहेत. संरक्षणमंत्र्यांनी आणखी एक बैठक घेतली. तिन्ही सेनादलांचे प्रमुख, संरक्षण दल प्रमुख जनरल बिपिन रावत, संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे प्रमुख तसंच संरक्षण विभागाच्या वैद्यकीय सेवेचे प्रमुख त्यात सहभागी झाले होते.