मुंबई (वृत्तसंस्था) : सोलापूरमध्ये विमानतळ परिसरात काल रात्री साडे अकराच्या सुमाराला आग लागली. अग्नीशमन दलाच्या जवानांनी ५ बंबाच्या सहाय्यानं ही आग आटोक्यात आणली.
सुरुवातीला शंकरनगरच्या बाजूने आग लागल्याचे नागरिकांनी सांगितले. विमानतळाच्या तीनही बाजूंनी आग पसरत गेली. वाळलेले गवत आणि वाऱ्यामुळे आग चांगलीच भडकली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. आणि आग पसरू नये म्हणून त्यांनी प्रयत्न सुरू केले. या आगीच्या झळा परिसरातल्या शंकर नगर, रेवणसिध्देश्वर नगर, भारातमाता सोसायटीतील घरांना लागत होत्या. त्यामुळे या परिसरातील नागरिक घराबाहेर पडले होते. आगीच्या ज्वाळांमुळे परिसरात एकच घबराट पसरली.
रात्री उशिरापर्यंत आग धुमसत होती, विमानतळ परिसराला सुरक्षा भिंत असल्याने मोठा अनर्थ टळला. आगीत कोणतीही जीवीत किंवा वित्त हानी झाली नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.