नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तानमधे कर्तारपूर मार्गिकेविषयी प्रसिद्ध झालेल्या चित्रफितीमधे खलिस्तानी फुटीरतावादी जर्नेल सिंह भिंद्रनवाले यांना दाखवल्याचा भारतानं तीव्र निषेध व्यक्त केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रवीश कुमार यांनी नवी दिल्ली इथं समाज माध्यमांशी बोलताना हे सांगितलं.
कर्तारपूर गुरुद्वारा इथल्या तीर्थ यात्रेला जाणा-या भारतीय शीख बांधवांच्या भावानांना दुखावणारी ही चित्रफित त्वरित हटवावी, अशी मागणी कुमार यांनी केली आहे. येत्या शनिवारी भाविकांचा पहिला जथ्था कर्तारपूर इथं पोहोचणार असून पाकिस्ताननं याला संमती दिल्याचं कुमार म्हणाले.
भाविकांनी तीर्थयात्रेला जाताना संमतीपत्र तसंच आवश्यक ती सर्व कागदपत्रं सोबत बाळगावीत असं आवाहन कुमार यांनी यावेळी केलं.