मुंबई : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाद्वारे येत्या पौर्णिमेला दिनांक ११ नोव्हेंबर २०१९ रोजी गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्याच्या जवळ असलेले निसर्गरम्य पर्यटक निवास बोदलकसा येथे पौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
वन्यजीव अभ्यासक व ज्येष्ठ लेखक मारुती चित्तमपल्ली यांच्यासोबत यावेळी रानगप्पांचा कार्यक्रम होणार आहे.
साहित्य क्षेत्रातील नामांकित तसेच नवोदित कलाकारांसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे. पौर्णिमा महोत्सवाच्या माध्यमातून पर्यटकांमध्ये निसर्ग तसेच वन्यजीवांविषयी गोडी निर्माण करणे हा महामंडळाचा मानस आहे तसेच महोत्सवाच्या माध्यमातून आपली पारंपरिक कला, संस्कृती, साहित्य याची ओळख पर्यटकांना करून देण्यात येणार आहे. दर महिन्याच्या पौर्णिमेस महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या प्रत्येकी एका पर्यटक निवासात पर्यटकांसाठी मोफत सांस्कृतिक, साहित्यिक चर्चांचे आयोजन करण्यात येत असून पर्यटक हे निवासाच्या परिसरातच सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकतात. आगामी कालावधीत मारुती चितमपल्ली, ना.धो.महानोर, फादर फ्रान्सिस दिब्रेटो या साहित्यिकांची मांदियाळी पर्यटकांना विविध पर्यटक निवासात विनामूल्य अनुभवण्यास मिळणार आहे.
हा महोत्सव जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजा दयानिधी, वनसंरक्षक व क्षेत्र संचालक रामानुज आणि उप वनसंरक्षक एस.युवराज यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. महोत्सवाच्या अधिक माहिती करिता श्री.विजय शेरकी,निवास व्यवस्थापक बोदलकसा, पर्यटक निवास बोदलकसा( मोबाईल नंबर ७४-९८-०७-२३-०९) तसेच श्रीमती पूजा कांबळे, माहिती सहायक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, वेस्ट हायकोर्ट रोड, ग्रामीण तहसील कार्यालय सिव्हिल लाईन्स, नागपूर दूरध्वनी क्रमांक २५३३३२५ येथे संपर्क साधावा.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने दिनांक २१ जानेवारी २०१९ रोजी प्रख्यात कवी संदीप खरे यांच्या मुख्य उपस्थितीत पर्यटक निवास कुणकेश्वर येथे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे, यांच्या उपस्थितीत पौर्णिमा महोत्सवाचे उदघाटन झाले होते.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत डिसेंबर २०१८ पासून पोर्णिमेचे औचित्य साधून पौर्णिमा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या पौर्णिमा महोत्सवाची संकल्पना व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे यांची असून पौर्णिमा महोत्सवाची माहिती महाराष्ट्र पर्यटन महामंडळाचे मुख्य लेखाधिकारी, मुंबई तथा विभागीय पर्यटन प्रमुख विदर्भ विभाग यांनी दिलेली आहे.