पिंपरी : पिंपरी-चिंचवड मधील पवना नदी पात्रातील केजुबाई धरणात लाखो मासे मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गंभीर बाब म्हणजे काही महिन्यांपूर्वी देखील अशाच प्रकारे मृत हजारो माशांचा खच धरणातील पाण्याच्या कडेला आढळला होता. ही सर्व घटना काही सामाजिक संस्थांमुळे पुढे आली आहे. त्यामुळे झोपेचं सोंग घेतलेल्या महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांना जाग कधी येणार? तसेच संबंधित व्यक्तींवर कडक कारवाई होणार का? हा प्रश्न आहे. केजुबाई येथील धरणात लाखो मृत माशांचा खच पडला आहे. त्यांच्या मृत्यूचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पाण्याचे आणि मातीचे नमुने महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी आणि प्रदूषण बोर्डाने घेतले आहेत. त्यानंतर संबंधितांवर कारवाई केली जाईल असे सांगण्यात येत आहे.
दरम्यान, पवना नदीपात्रात रसायनयुक्त आणि मानवी मैलाचे पाणी सर्रास सोडलं जातं. मोठ्या प्रमाणावर जलपर्णी असून दरवर्षी करोडो रुपये खर्च करून पवना नदी पात्रातील जलपर्णी जैसे थेच आहेत. काही सामाजिक संस्थांनी पुढाकार घेऊन जलपर्णी काढली. मात्र महानगरपालिका पुढाकार घेताना दिसत नाही. मोठ्या प्रमाणावर जलपर्णी असल्याने पाण्यातील माशांना ऑक्सिजन मिळत नसल्याचे सांगण्यात येतय.
‘पाण्याचे नमुने घेतले आहेत. त्याचा अहवाल काय येईल ते पाहू. अचानक अशी घटना घडत नाही. गेल्या प्रकरणात प्रदुषण बोर्डाने लाँड्रीवाल्यांना नोटिसा पाठवल्या होत्या. पण म्हणावी तशी कारवाई झालेली नाही. ते ऐकत नसतील तर त्यांच्यावर फौजदारी कारवाई होईल.’ असे सह शहर अभियंता मकरंद निकम यांनी सांगितले.