नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, पदोन्नतीतलंआरक्षण, जीएसटी परतावा, शेतकरी पीक विमा सुलभीकरण, चक्रीवादळमदतीचे निकष बदलणं, चौदाव्या वित्त आयोगाचा थकीत निधी मिळावा. मराठा भाषेला अभिजातदर्जा द्यावा, राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या बारा सदस्यांची निवड, कांजुरमार्ग कारशेडचा मुद्दा, बल्क ड्रग पार्क मंजुरी अशा राज्यातल्या महत्त्वाच्या प्रमुख मुद्यांवरआज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

मुख्यमंत्र्यांसोबत यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण उपस्थित होते.प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्व मुद्यांवर सकारात्मक चर्चा केली, असं मुख्यमंत्र्यांनी बैठकीनंतर वार्ताहरांना सांगितलं. ही चर्चा सकारात्मक झाली असून यावर केंद्रसरकार लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेईल अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

केंद्रसरकारनं ५० टक्के आरक्षणाची मर्यादा शिथिल करावी अशी मागणी आपण प्रधानमंत्र्यांना केल्याची माहिती यावेळी अशोक चव्हाण यांनी दिली. केंद्रसरकारनं आपल्या अधिकारांचा लाभ हा महाराष्ट्रातल्या जनतेला करुन द्यावा, असंही ते म्हणाले.

आरक्षणाचा प्रश्न हा केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून तो इतर राज्यांचाही आहे. त्यासाठी केंद्रानं त्वरित पावलं उचलून तोडगा काढावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली. राज्याचा चोवीसहजार २६० कोटींचा जीएसटी परतावा लवकरात लवकर मिळावा अशी विनंती प्रधानमंत्र्यांकडे केल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. दरम्यान, केंद्रसरकारनं लस पुरवठ्याबाबत काल घेतलेला निर्णय हा स्वागतार्ह आहे. यामुळे लस पुरवठ्यातल्या त्रुटी दूर होऊन देशातल्या सर्व नागरिकांचं लसीकरण व्हायला मदत होईल, असंमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.