नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या 146 जिल्ह्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वाधिक असून त्या ठिकाणचा संसर्ग नियंत्रणात आणण्यावर केंद्र सरकारनं लक्ष केंद्रित केलं आहे. त्याच वेळी देशाचा कोविड मृत्यू दर कमी होत असून सध्या तो 1 पूर्णांक 17 शतांश टक्के आहे अस आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी काल नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत सांगितलं.
महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, छत्तीसगड आणि केरळ या राज्यात उपचाराधीन रुग्णांची संख्या एक लाखापेक्षा जास्त आहे; त्या अनुषंगानं आरोग्य सुविधा वाढवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारं एकत्रितपणे काम करत आहेत असं भूषण म्हणाले.
देशात लसीकरणाचा वेगही वाढत असून आता पर्यंत 13 कोटी 23 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत. 87 टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीची पहिली मात्रा; तर 80 टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांनी लसीची दुसरी मात्रा घेतली आहे.
कोविड प्रतिबंधक लस घेतल्यानंतर विषाणू संसर्ग होण्याचं प्रमाण नगण्य आहे असं ICMR चे महासंचालक डॉ बलराम भार्गव यांनी यावेळी सांगितलं. जैव तंत्रज्ञान विभागाच्या सहाय्यानं बायोलॉजीकल ई कंपनी तयार करत असलेल्या आणखी एका स्वदेशी लसीच्या; पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातल्या वैद्यकीय चाचण्या झाल्या आहेत; आणि येत्या ऑगस्ट पर्यंत ही लस उपलब्ध होईल असं नीती आयोगाचे सदस्य व्ही के पॉल यांनी यावेळी सांगितलं.