नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरात कोविड-१९ वरील २६० लसींवर विविध टप्प्यांमध्ये काम सुरु असून, त्यापैकी ८ लसींचे उत्पादन भारतात करण्याचे नियोजन आहे. या ८ पैकी ३ लसी पूर्णपणे देशांतर्गत निर्मित असतील असे केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी म्हटले आहे.

जागतिक बँकेद्वारे कोविड-१९ विरुद्ध दक्षिण आशियातील लसीकरणाबाबत मंत्रीस्तरीय बैठकीला काल दूरदृश्य पद्धतीने संबोधित करताना डॉक्टर हर्षवर्धन बोलत होते.

प्रभावी नियोजन आणि धोरणात्मक व्यवस्थापनामुळे भारतात कोविड-१९ ची प्रति दशलक्ष रुग्ण संख्या ७ हजार ७८ राखण्यात यश आल्याचे त्यांनी नमूद केले. जागतिक पातळीवर हे प्रमाण ८ हजार ८८३ आहे.

भारतातील लसीचे वितरण, उत्पादन आणि साठवण क्षमतेबाबत त्यांनी माहिती दिली.

भारतातील जागतिक दर्जाच्या संशोधन संस्थां कोविड-१९ विरुद्ध मोहिमेत आघाडीवर असून सध्या लसीची निर्मिती, वितरण आणि ती टोचण्यासाठी क्षमतावृद्धिसाठी त्या काम करत असल्याचे हर्षवर्धन म्हणाले.