मुंबई (वृत्तसंस्था) : अनेक पब आणि नाईट क्लबमध्ये कोरोनासंबंधी नियमांचे उल्लंघन होत असल्याने मुंबईमध्ये रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करावी, अशी विनंती करणारे पत्र मुंबई महापालिकेने महाराष्ट्र सरकारला लिहिले आहे.
साथरोग कायदा १८९७ लागू असल्याने एका ठिकाणी ५० हून अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास परवानगी नाही. तसेच, अनेक खाद्यपदार्थ विक्री करणारी दुकाने, पब आणि नाईट क्लब रात्री साडे ११ ला बंद होणे अपेक्षित आहे. तरीही अनेक ठिकाणी या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे मुंबईचे महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी सांगितले.
जनतेमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता असल्याने राज्य सरकार सध्या कोणतेही निर्बंध घालण्यास तयार नसल्याचे चहल यांनी काल सांगितले. मात्र, नियमांचा भंग होतच राहिला तर संचारबंदी लागू करावी लागेल, असे ते म्हणाले.