नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आधुनिक भारतातल्या गावांना पूर्णतः आत्मनिर्भर बनवण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

पंचायत राज दिनानिमित्तानं आज ऑनलाईन पद्धतीनं झालेल्या कार्यक्रमात प्रधानमंत्र्यांनी राष्ट्रीय पंचायत राज पुरस्कारांचं वितरण केलं त्यावेळी ते बोलत होते.

देश भरातल्या ग्राम पंचायतींच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारनं सुमारे २ लाख २५ हजार कोटी रुपये उपलब्ध करून दिले असल्याचं त्यांनी सांगितलं.

ग्रामीण भारताच्या विकासासाठी सुरु असलेल्या कामांमध्ये अधिक पारदर्शकता यावी यासाठी ई-ग्राम स्वराज उपक्रमावर अधिक भर दिला जात असल्याचं ते म्हणाले.

ग्रामपंचायतींनी स्थानिक पातळीवर भू-जल, स्वच्छता, कृषी तसंच शिक्षणासंबंधीचे उपक्रम राबवावेत असं आवाहनही त्यांनी केलं.

यावेळी प्रधानमंत्र्यांनी स्वामीत्व योजनेच्या संपूर्ण देशभरातल्या अंमलबजावणीलाही सुरुवात केली. या योजनेअंतर्गत मालमत्ता कार्ड मिळालेले नागरिकांना बँका आणि वित्तीय संस्थांमधून कर्ज मिळवणं अधिक सुलभ होऊ शकतं असं त्यांनी सांगितलं.

यावेळी चार लाखाहून अधिक नागरिकांना त्यांच्या ई-मालमत्ता कार्डाचं वाटपही ऑनलाईन पद्धतीनं केलं गेलं.

ग्रामीण भागातल्या जनतेनं कोरोना प्रतिबंधक नियमांचं काटेकोर पालन करावं असं आवाहनही प्रधानमंत्र्यांनी केलं.