मुंबई (वृत्तसंस्था) : नाशिक आणि विरार इथल्या रुग्णालयांमध्ये झालेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या सर्व रुग्णालयांचं फायर तसंच ऑक्सिजन ऑडीट करावं असे निर्देश राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी जिल्हा यंत्रणांनांना दिले आहेत.

कुंटे यांनी काल सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्यासोबत दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला.

रुग्णालयांमधल्या ऑक्सिजनच्या नलिका, साठवणुक यंत्रणांमधल्या गळतीसंदर्भातल्या तपासणीसोबतच, ऑक्सिजन वाया जावू नये यासाठी टास्क फोर्सच्या सूचनांचं पालन होत आहे किंवा नाही याबाबतही तपासणी करावी, अशी सूचना त्यांनी केली.

ऑक्सिजन टॅंकरना रुग्णवाहिकेचा दर्जा दिला आहे, या टँकरची वाहतूक पोलिस संरक्षणात करावी, तसंच टॅंकर परस्पर वळवू नयेत अशा सूचना त्यांनी केल्या.