पुणे : रेमडेसिवीर इंजेक्शनचे रुग्णालयनिहाय वाटप करण्यात आले असून कोविड रुग्णालयांनी त्यांचे नावासमोर दर्शविण्यात आलेल्या संख्येप्रमाणे व औषध पुरवठादार नुसार तात्काळ इंजेक्शन शासनाने निश्चित केलेल्या दराने प्राप्त करुन घ्यावेत. रुग्णालयाची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या http://pune.gov.in/corona-virus-updates/ या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी परिपत्रकाद्वारे कळविली आहे.
कोणत्याही प्रकारची दिरंगाई, टाळाटाळ, कसूर होणार नाही याची दक्षता रुग्णालय प्रशासन व घाऊक विक्रेते यांनी घ्यावी. संबंधित कोविड रुग्णालयांनी सदरचा औषध साठा प्राप्त करुन घेण्याकामी रुग्णालयाच्या लेटर हेडवर सही शिक्क्यानिशी प्राधिकारपत्र व प्राधिकृत व्यक्तीचे फोटो ओळखपत्र घाऊक विक्रेत्याकडे सादर करणे आवश्यक आहे. याबाबतची खातरजमा करुन घाऊक विक्रेत्यांनी औषधाचे सुयोग्य वितरण या आदेशाचे दिनांकास मुदतीत व शासकीय वाजवी दरात करावे.
कोविड-19 वैश्विक साथीमध्ये काम करणारे फ्रंटलाईन वर्कर्स उदा. आरोग्य सेवा, महानगरपालिका, नगरपालिका, पोलीस, महसूल, ग्रामविकास, नगरविकास, अन्न व औषध प्रशासन, परिवहन इत्यादी विविध आस्थापनांच्या अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी 10 टक्के कोटा राखीव ठेवण्याचे निर्देश आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग यांनी दिले असल्याने त्यास प्राधान्य देण्यात यावे.
पुणे महानगरपालिका, पिंपरी महानगरपालिका, पुणे छावणी परिषद, पुणे ग्रामीण, नगरपालिका प्रशासन व नगर पंचायतसह आयुक्त औषध व प्रशासन, यांनी याबाबत वितरण तक्त्यानुसार वाटप होत असल्याची व वितरीत औषधांचा उचित विनियोग होत असल्याची वेळोवेळी खातरजमा करुन अनियमितता आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी. या आदेशातील क्र.3 मधील भरारी पथकांनी वाटप तक्त्यानुसार वाटप व विनियोगाबाबत खातरजमा करुन अनियमितता आढळल्यास संबंधित रुग्णालय प्रशासन/ घाऊक विक्रेते यांच्यावर नियमानुसार कारवाई करुन अहवाल सादर करावा, अशा सूचनाही परिपत्रकान्वये देण्यात आलेल्या आहेत.