नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेवून केंद्र सरकारने विशिष्ट कर अनुपालनांसाठी करदात्यांना मुदत वाढ दिली आहे. अर्थ मंत्रालयाच्या एका निवेदनात म्हटलं आहे की, प्राप्तीकर कायद्यांतर्गत अपील आयुक्तांकडे अपील करण्याची आणि तंटा निवारण समितीकडील आक्षेपांची मुदत ३१ मे पर्यंत वाढविण्यात आली आहे.

त्याचबरोबर नोटिसीला उत्तर म्हणून  प्राप्तिकर विवरणपत्र नोटिसीत दिलेल्या कालावधीत किंवा ३१ मे पर्यंत दाखल करता येतील.  या व्यतिरिक्त २०२०-२०२१ साठी विलंबित आणि सुधारित विवरणपत्र जे ३१ मार्च अखेरपर्यंत भरण्याची मुदत होती ते देखिल ३१ मे किंवा त्यापूर्वीपर्यंत भरता येणार आहेत.