- वन विभागाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; तेरा कोटी वृक्षलागवडीला ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्डचे‘ प्रमाणपत्र
मुंबई : राज्यात होत असलेल्या वृक्षलागवडीची सलग तिसऱ्यांदा लिम्का बुक ऑफ रेकॉर्डने नोंद घेतली असून नुकतेच सन २०१८ मध्ये झालेल्या तेरा कोटी वृक्षलागवडीसाठी वन विभागाला लिम्का बुक ऑफ रेकॉर्डचे प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.
हा राज्यातील पर्यावरणस्नेही लोकांनी एकत्र येऊन साजरा केलेल्या वृक्षोत्सवाचा सन्मान आहे, या वृक्षलागवडीत वन विभाग, राज्य आणि केंद्र शासनाचे विविध विभाग, स्वयंसेवी संस्था, अध्यात्मिक संस्था, व्यापारी-उद्योजक, शेतकरी, कामगार वर्ग,गृहनिर्माण संस्था, सिनेक्षेत्रातील मान्यवर, शालेय- महाविद्यालयीन विद्यार्थी व शिक्षक यांच्यासह राज्यातील लोकप्रतिनिधी, माध्यम प्रतिनिधी या सर्वांनी योगदान दिले आहे, मी त्यांचा आभारी आहे अशी प्रतिक्रिया वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.
वन विभागाचे चौथे प्रमाणपत्र
या तीन व कांदळवन विकासात राज्याने केलेल्या भरीव प्रयत्नाचा सन्मान म्हणून लिम्का बुक ऑफ रेकॉर्डने केलेल्या नोंदीचे एक असे मिळून वन विभागाला आतापर्यंत लिम्का बुक ऑफ रेकॉर्डची ४ प्रमाणपत्रे मिळाली असल्याची माहितीही वनमंत्र्यांनी दिली.
१३ कोटी वृक्षलागवड
राज्यात १ जुलै ते ३१ जुलै २०१८ या कालावधीत वन विभागाने लोकसहभागातून तेरा कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवले होते. प्रत्यक्षात राज्यात १५ कोटी ८८ लाखांहून अधिक वृक्षलागवड झाली. तर ३८ लाखांहून अधिक लोक या वृक्षलागवडीत सहभागी झाले. १ लाख ४५ हजार ६८३ जागांवर ही वृक्षलागवड झाली होती. यासंबंधीचे लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड चे प्रमाणपत्र वन विभागास नुकतेच प्राप्त झाले आहे.
४ कोटी वृक्षलागवड
यापूर्वी राज्यास ४ कोटी वृक्षलागवडीसाठी लिम्का बुक ऑफ रेकॉर्डचे प्रमाणपत्र प्राप्त झाले होते. यावेळी वन विभागाने १ ते ७ जुलै २०१७ या कालावधीत लोकसहभागातून ५ कोटी ४३ लाखांहून अधिक वृक्षलागवड केली होती. ९४ हजार २५७ ठिकाणी ही वृक्षलागवड झाली होती. यात सोळा लाख लोक सहभागी झाले होते. १८५ प्रजातींची झाडे यात लावली गेली होती.
२ कोटी वृक्षलागवड
२०१६ मध्ये १ जुलै २०१६ रोजी एकाच दिवशी दोन कोटी वृक्षलागवडीचा संकल्प २ कोटी ८१ लाखांहून अधिक वृक्षलागवड होऊन पूर्णत्वाला गेला होता. यात सहा लाखांहून अधिक लोक सहभागी झाले होते. ६५ हजार ६७४ ठिकाणी १५३ प्रजातींची रोपे लावण्यात आली होती. १२ तासात झालेल्या या वृक्षलागवडीसही लिम्का बुक ऑफ रेकॉर्डचे प्रमाणपत्र प्राप्त झाले होते.
३३ कोटी वृक्षलागवडीची पूर्णत्वाकडे वाटचाल
राज्यात जुलै ते सप्टेंबर २०१९ या कालावधीत लोकसहभागातून ३३ कोटी वृक्षलागवडीचा संकल्प आहे. आजपर्यंत राज्यात २९ कोटी १८ लाख ८५ हजार १६७ वृक्षलागवड झाली आहे. यात ८४ लाख १८ हजार ३५५ लोकांनी सहभाग नोंदवला आहे अशीही माहिती वनमंत्र्यांनी दिली.