सेंटर फॉर एक्सलन्ससाठी डेलशी पुणे स्मार्ट सिटीचा सामंजस्य करार
पुणे : पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या वतीने आयोजित इन्व्हेस्ट इंडिया- स्मार्ट सिटी मिशन तंत्रज्ञान कार्यशाळा यशस्वीरीत्या संपन्न झाली. शहरांना भेडसावणाऱ्या समस्यांशी संबंधित चार व्यापक क्षेत्रांत काम करणारे स्टार्टअप्स यावेळी सहभागी झाले होते. या एकदिवसीय कार्यक्रमादरम्यान विविध स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे विविध स्टार्टअप्सनी त्यांची तंत्रज्ञानविषयक मांडणी केली. स्टार्टअप्सच्या प्रस्तावित तंत्रज्ञान उपायांचा गरजेनुसार अवलंब या संबंधित स्मार्ट सिटी करणार आहेत.
स्टार्टअप्समधून नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान स्वीकारण्यात पुणे स्मार्ट सिटी आघाडीवर आहे. म्हणूनच पुणे स्मार्ट सिटीने या कार्यशाळेच्या आयोजनात पुढाकार घेतला होता. पुणे स्मार्ट सिटीने यावेळी डेल कंपनीसोबत फॉर सेंटर ऑफ एक्सलन्ससाठी एक सामंजस्य करारही केला.
स्टार्टअप्स आणि स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांची चार फेऱ्यांमध्ये चर्चासत्रे आयोजित करण्यात आली होती. स्मार्ट सिटीज मिशन आणि इन्व्हेस्ट इंडिया यांच्यात यावेळी सामंजस्य करारही झाला. पथदर्शी प्रकल्पांसाठी स्मार्ट सिटीज आणि निवडक स्टार्टअप्स दरम्यान उद्देशीय करारपत्रांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
स्मार्ट सिटीज मिशनचे मिशन संचालक व गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाचे सहसचिव श्री. कुणाल कुमार, पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप, इन्व्हेस्ट इंडियाचे राहुल नायर, तसेच इतर पंधरा स्मार्ट सिटींचे मुख्य कार्यकारी अधिकारी व वाहतूक पोलिस उपायुक्त पंकज देशमुख, श्री. बोस व विविध संस्थांचे प्रतिनिधी, अधिकारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना स्मार्ट सिटीज मिशनचे मिशन संचालक व गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाचे सहसचिव श्री. कुणाल कुमार म्हणाले की, “भारतीयांची जीवनशैली आणि कार्यपद्धती ही तंत्रज्ञानामुळे पूर्णपणे बदलून जाईल. आणि स्मार्ट सिटी मिशनमधील शहरे या परिवर्तनात आघाडीवर असतील. अग्नि आणि स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून संपूर्ण भारतातील नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या परिप्रेक्ष्यात क्युरेटिंग करण्यात इन्व्हेस्ट इंडिया ही संस्था आघाडीवर आहे.”
स्टार्टअप्सची चार व्यापक कार्यक्षेत्रे पुढीलप्रमाणे आहेत: १) वाहतूक व्यवस्थापन, वाहतूक व गतिशीलता, प्रदूषण व्यवस्थापन, २) पाणी, स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापन, ३) सुरक्षा, पाळत ठेवणे व सुरक्षा, ४) आरोग्य व शिक्षण. शहरांमध्ये जाणवणाऱ्या अडचणी ओळखण्यासाठी इन्व्हेस्ट इंडियाने स्मार्ट सिटीज मिशनच्या सहयोगाने काम करून त्यावर उपाययोजना करण्यासाठी स्टार्ट-अपच्या माध्यमातून वापरायोग्य तंत्रज्ञान उपाय निश्चित केले आहेत.
इन्व्हेस्ट इंडिया ही भारताची राष्ट्रीय गुंतवणूक प्रोत्साहन आणि सुविधा देणारी संस्था आहे, ही वाणिज्य व उद्योग मंत्रालयाअंतर्गत एक ना-नफा ना तोटा तत्त्वावर स्थापन केलेली संस्था आहे. अग्नि आणि स्टार्टअप इंडिया हे देखील इन्व्हेस्ट इंडियाद्वारे चालविण्यात येणारे भारत सरकारचे दोन प्रमुख उपक्रम आहेत.
या कार्यक्रमाचे प्रमुख फायदे–
– तंत्रज्ञान पुरवठादार आणि तंत्रज्ञान वापरकर्ते यांच्यातील अंतर एका व्यासपीठावर आले.
– स्मार्ट सिटीजमध्ये जाणवणाऱ्या समस्यांवर तंत्रज्ञानाद्वारे अंमलबजावणी शक्य.
– वाहतूक क्षेत्रातील अडचणी, तसेच स्वच्छता आणि प्रदूषणासंबंधी समस्यांवर तंत्रज्ञानाच्या उपाययोजनांच्या दिशेने वाटचाल.