पिंपरी : लॉकडाऊन काळात रोजगार गमावलेल्या राज्यातील असंघटीत कामगारांची नोंदणी करुन त्यांना अनुदान द्यावे अशी मागणी भाजपा कामगार आघाडीचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष प्रकाश मुगडे यांनी केली आहे.

कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे राज्यात व अनेक जिल्ह्यात मार्च 2020 पासून अनेकवेळा लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे छोटे मोठे उद्योग, व्यवसाय आर्थिक संकटात सापडले आहेत. राज्यातील बहुतांशी व्यापाऱ्यांनी दुकानात काम करणाऱ्या सेल्समन, सेल्सगर्ल यांना कामावरुन कमी केले आहे किंवा त्यांच्या पगारात कपात केली आहे.

पुणे, मुंबई, ठाणे, नागपूर, नाशिक, पिंपरी चिंचवड या शहरांसह तालुका व गाव पातळीवर असणाऱ्यां अशा व्यापाऱ्यांची संख्या लाखांमध्ये आहे. या दुकानांमध्ये काम करणाऱ्या असंघटीत कामगारांची संख्या जवळपास सतरा ते अठरा लाख आहे. राज्य सरकारने मागिल वर्षभरात घरकाम करणाऱ्या महिला रिक्षा चालक, बांधकाम कामगार, फेरी, पथारी, टपरी व्यवसायिक अशा नोंदणीकृत कामगारांना आणि झोपडीधारकांना ऑनलाईन पध्दतीने बॅंक खात्यात अनुदानाचे पैसे वर्ग करुन मदतीचा हात दिला आहे. परंतू असंघटीत क्षेत्रात तसेच मोलमजूरी करुन उदरनिर्वाह करणाऱ्या नागरीकांनाही अशा प्रकारे शासनाने तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनी आर्थिक मदत करावी.

राज्यातील कपडा व्यापारी, सोने – चांदी व्यापारी, इलेक्ट्रॉनिक हार्डवेअर, शेती अवजारे, खत विक्री, जनरल स्टोअर, किराणा माल विक्रेते, स्विट मार्ट, मोबाईल शॉप, पादत्राणे विक्रेते, भांडी, फुल विक्रेते, हॉटेल, रेस्टॉरंट, खासगी सुरक्षा रक्षक (बाऊंन्सर), सांस्कृतिक क्षेत्रातील बॅकस्टेज कलाकार अशा विविध क्षेत्रात व्यापारी आस्थापनांमध्ये जवळपास सतरा ते अठरा लाख असंघटीत कामगार आहेत. या कामगारांची शासनाने नोंदणी करावी तसेच सहानुभूतीपुर्वक विचार करुन त्यांनाही अनुदान देऊन मदत करावी असे आवाहन भाजपा कामगार आघाडीचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष प्रकाश मुगडे यांनी केले आहे.